- Breaking News, उद्घाटन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : वारंगा येथे परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार अंतरराष्ट्रीय गुरुकुल व अंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनचे लोकार्पण

कालमर्यादा निश्चित करून जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर समाचार : जगातील अनेक जुन्या संस्कृती कालागणिक व्यपगत झाल्या, नामशेष झाल्या. परंतु, भारतीय संस्कृतीला सनातन स्वरुपात टिकवून राहता आले. भारतीय संस्कृतीला टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य संस्कृत भाषेच्या माध्यमातून शक्य झाले. स्थापत्य, आयुर्वेद, खगोल, गणित, रसायन आदी ज्ञानशाखेतील ज्ञानभंडार संस्कृत भाषेमध्ये असून त्याला समाजापुढे नेण्यासाठी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आज वारंगा येथे परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार अंतरराष्ट्रीय गुरुकुल व अंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनचे लोकार्पण व विद्यार्थी भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कुलगुरु हरेराम त्रिपाठी, संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

संस्कृत भाषेचे विद्यापीठ साकारण्यासाठी डॉ. श्रीकांत जिचकार व माजी संस्थापक कुलगुरु डॉ. पंकज चांदे यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. कविकुलगुरु कालिदास यांच्या नावाने हे विद्यापीठ असल्याने ते रामटेक येथे व्हावे, अशी सुरुवातीला संकल्पना होती. तथापि, संस्कृत भाषेच्या या ज्ञानपिठाला वैश्विक स्तरावर पोहचणे सुलभ व्हावे, यासाठी आपण रामटेक तालुक्यातील व नागपूरपासून जवळ असलेल्या शैक्षणिक संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारंगा येथे हे संपूर्ण ज्ञानसंकुल विकसित करण्याचा निर्णय घेतला. येथे शेजारीच असलेल्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर येत्या काळात निश्चित कालमर्यादेत जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु, असे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृती, भारतीय जीवनमूल्य, भारतीय जीवनपद्धती याला अधोरेखित करुन यातील जीवनमूल्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी डॉ. हेडगेवार यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. संस्कृत ज्ञान भाषेतील हे मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. ती आपली ज्ञानभाषा आहे. 102 अब्ज 78 कोटी 50 लक्ष एवढी शब्दसंख्या संस्कृतमध्ये आहे. जगातील समृद्ध भाषा म्हणून संस्कृतकडे पाहिले जाते. या विद्यापीठाच्या माध्यमातून आपण संस्कृतला अधिक समृद्ध करुया, असे त्यांनी सांगितले.

संस्कृत भाषा मला शिकण्याची इच्छा आहे. माझी आई संस्कृतमध्ये एम.ए. असून भविष्यात या विद्यापिठाच्या सेवेत माझी समिदा मी निश्चित देईल, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

आत्मनिर्भर भारतासाठी आपल्यातील सत्व व बल देऊ- डॉ. मोहन भागवत

आजच्या जागतिक परिभाषेत ग्लोबलची भावना व वसुधैव कुटुंबकम एकच आहे. वसुधैव कुटुंबकम याचा पाया समृद्ध आहे. संस्कृत भाषेने दिलेले हे ज्ञानाचे बळ जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर त्यातील भावही आपल्या लक्षात आले पाहिजे. त्यासाठी भाषा आवश्यक असते. अनेक ज्ञानाचे भांडार संस्कृत भाषेतील पाठ, स्त्रोत्र यांच्या माध्यमातून अनेक घरात पोहचले असले तरी संस्कृत भाषा आता राजाश्रित होण्यासह लोकाश्रितही झाली पाहिजे, डॉ. भागवत यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हाच खरा महत्त्वाचा काळ आहे. यासाठी आपले सत्व मोलाचे आहे. स्वनिर्भरता ही या सत्वावर अवलंबून असते. बळही यासाठी आवश्यक असते. कोणत्याही बळाच्या पाठीमागे चित्त, मन व बुद्धी स्वाभिमानी असली की असे बळ अधिक विधायक ठरते, असे त्यांनी सांगितले.

सत्व आणि बळ जिथे असते तिथे ओज येते. ओजापाठोपाठ लक्ष्मीचाही तिथे वास निर्माण होतो या शब्दात त्यांनी समृद्ध भारताची भूमिका त्यांनी विषद केली. आजच्या भवतालाची ही गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपले बळ दिले पाहिजे. हे सत्व आपल्याला अधिक कळण्यासाठी संस्कृत भाषा हा मुख्य आधार आहे. संस्कृत भाषा व यातील ज्ञानाची शक्तीस्थळे आपण समजून घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

कुलगुरु आचार्य हरेराम त्रिपाठी यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यापिठामार्फत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. माजी कुलगुरु आचार्य उमा वैद्य, कुलसचिव देवानंद शुक्ल, अभिनव भारतीचे संचालक प्रो. कृष्णकुमार पाण्डेय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *