नागपूर जिल्ह्याची ओळख असलेल्या संत्रा प्रक्रियेसाठी रौप्य पदक
दिल्ली येथे शानदार समारंभात नागपुरचा गौरव
नागपूर समाचार : प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्टयपूर्ण असलेल्या उत्पादनाला व्यावसायिक मूल्यांसह चालना मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ओडीओपी अर्थात राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन- 2024 या अभिनव उपक्रमात महाराष्ट्राला सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या एका शानदार समारंभात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते महाराष्ट्राचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी सुवर्ण पदक स्वीकारले.
नागपुरच्या संत्रा पिकाला प्रक्रिया उद्योगातून केलेल्या व्यावसायिक वृध्दीसाठी रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा सन्मान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला.
भारत मंडपम, नवी दिल्ली येथे झालेल्या या समारंभास दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या सन्मानासह नागपुरच्या संत्रा पिकाला रौप्य पदक देऊन सन्मान केल्याचा मनस्वी आनंद आहे. प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व अनबलगन सर आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे नागपुरचा गौरव झाला आहे या शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्ण, अमरावती जिल्ह्याने मँडरीन ऑरेजसाठी कृषी क्षेत्रातील अ श्रेणी अंतर्गत तृतियस्थन मिळविले. नाशिक जिल्ह्याने द्राक्ष आणि मनुकांसाठी कृषी क्षेत्रातील श्रेणी अ अंतर्गत विशेष पुरस्कार मिळवला. अकोला जिल्ह्याने गैरकृषी क्षेत्रातील ब श्रेणी अंतर्गत कापूस जिनिंग प्रेसिंगसाठी विशेष पुरस्कार मिळवला.