- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही देणार भर – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

कवडस येथील निवासी आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे केले स्वागत 

नागपूर समाचार : ज्या विश्वासाने पालक शासकीय आश्रमशाळेत मुलांना दाखल करतात त्या विश्वासाला सार्थकी लावण्याची जबाबदारी ही शिक्षक व शाळेवर असते. पालकांच्या मनात आपल्या मुलांप्रती असलेल्या उज्वल भविष्याला साकार करण्यासाठी आश्रम शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कठोर मेहनत घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले. 

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कवडस येथे आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात पालकांशी साधलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच उषा रविंद्र सावळे, आदिवासी विकासाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, उपायुक्त दिंगबर चव्हाण, आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर व मान्यवर उपस्थित होते. 

राज्यातील आदिवासी विकास विभागाअंतर्गत व शासन अनुदानित ज्या काही शाळा, शिक्षण संस्था आहेत त्यात शिकणाऱ्या आदिवासी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाहीत. शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांमुळे आपण आहोत हे शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तसमवेत त्यांच्या आहारातील गुणवत्ता ही चांगलीच असली पाहिजे. याबाबत मुख्याध्यापक, संस्थाप्रमुख हे योग्य ती खबरदारी घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.          

शिक्षण क्षेत्रातील बदलांना व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीबाबत प्रक्रियेचा मी स्वत: एक भाग राहिलो आहे. विद्यार्थ्यांप्रती प्रत्येक शिक्षकांच्या मनात जी कणव असते ती अधिक समर्थपणे जपणे आवश्यक आहे. शिक्षकांनी पालकांशीही मनमोकळा संवाद साधला पाहिजे. या विश्वासार्हतेतून विद्यार्थ्यांना बळ मिळते. मुलांच्या अंगातील सुप्त गुण हे गुरुजणांनी लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही शाळेच्या केंद्रबिंदू ही मुलेच आहेत असे त्यांनी स्पष्ट केले

आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी 1751 प्रलंबित जागा येत्या शैक्षणिक सत्रापर्यंत भरती केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी विभागासाठी कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता नसून 17 विभागाद्वारे आदिवासी विभागाच्या योजना या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आदिवासी विभागाने संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील कोणताही आदिवासी व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी “प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” हाती घेतले आहे. हे अभियान अधिक सक्षमपणे संपूर्ण राज्यात प्रभावीपणे राबविले जात असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *