■ क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी विविध संघटनांकडून सत्कार
नागपूर समाचार : नागपूर शहराच्या क्रीडा क्षेत्रातून एक नवा यशस्वी इतिहास निर्माण होत आहे. खासदार क्रीडा महोत्सवासारख्या व्यासपीठामुळे जगात नागपूरचे नावलौकीक करणारे खेळाडू पुढे येत आहेत. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या खंबीर आणि सक्षम नेतृत्वामुळे नागपूर शहरातील क्रीडा क्षेत्रात मोठे परिवर्तनकारी बदल होत आहेत. या बदलाचा एक भाग असल्याचा आनंद आहे. आता विधानपरिषदेचा सदस्य म्हणून जबाबदारी आलेली असली तरी क्रीडा विषयक जबाबदारी विसरणार नाही. खेळ आणि खेळाडूंच्या पाठीशी सदैव तत्पर राहिल, अशी ग्वाही आमदार श्री. संदीप जोशी यांनी दिली.
नागपूर क्रीडा संघटना, क्रीडा प्रेमी व खेळाडूंच्या वतीने गुरुवारी (ता. १०) संत जगनाडे महाराज चौक येथील एनआयटी कर्मचारी सांस्कृतिक सभागृह येथे क्रीडा क्षेत्रातील अतुल्य कार्याबद्दल आमदार श्री. संदीप जोशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मंचावर महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, ज्येष्ठ क्रीडा संघटक बबनराव तायवाडे, अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार्थी विजय मुनीश्वर, ज्येष्ठ पत्रकार राम ठाकूर, दिपक कविश्वर, माजी क्रीडा सहसंचालक जयप्रकाश दुबळे, डॉ. पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आमदार श्री. संदीप जोशी यांचा चांदीची गदा, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
आमदार श्री. संदीप जोशी यांनी सत्कारासाठी सर्व क्रीडा संघटनांनी एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी देखील सर्व क्रीडा संघटनांनी असेच एकत्र राहिल्यास नागपूरचे क्रीडा क्षेत्र मोठ्या उंचीवर जाईल, असा विश्वासही व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील क्रीडांगणांच्या विकासासाठी १५० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक संघटनांनी आपल्या परिसरातील क्रीडांगण, स्टेडियमच्या विकासासाठी आवश्यक कार्याचे पत्र सात दिवसांच्या आत सादर करावे, असे आवाहनही आमदार जोशी यांनी केले. राजकारण आणि जातपात बाजूला ठेवून केवळ खेळाडू केंद्रस्थानी ठेवून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी काम करत आहेत. सर्व संघटनांनी देखील आपसातील वाद बाजूला ठेवून कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले खासदार क्रीडा महोत्सव हे नागपूर शहरच नव्हे तर देशासाठी आदर्श ठरत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जगात छाप सोडण्याचा इतिहास निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे नंतर आता शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूने आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले, हे अभिमानादास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले. एकेकाळी नागपूर शहराची शान असलेली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी ज्येष्ठ क्रीडा संघटक बबनराव तायवाडे यांनी आपल्या भाषणातून केली. त्याला उत्तर देताना आमदार श्री. संदीप जोशी यांनी खासदार क्रीडा महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा सहभाग करता येईल का, यादृष्टीने समितीसोबत चर्चा करण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, ज्येष्ठ क्रीडा संघटक बबनराव तायवाडे, अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार्थी विजय मुनीश्वर यांनी आपल्या भाषणातून आमदार श्री. संदीप जोशी यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव केला.
प्रास्ताविकातून डॉ. पीयूष आंबुलकर नागपूर शहरातील क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. कार्यक्रमात डॉ. पद्माकर चारमोडे, विवेक अवसरे, संभाजी भोसले, नागेश सहारे, अशफाक शेख, सौरभ मोहोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आरजे आमोद यांनी केले व आभार डॉ. पद्माकर चारमोडे यांनी मानले.
या संघटनांनी केला सत्कार
खासदार क्रीडा महोत्सव समिती, नागपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन, नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, नागपूर जिल्हा कराटे असोसिएशन, साई स्पोर्टिंग क्लब, विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, स्पोर्ट्स तायक्वांडो असोसिएशन, नागपूर फेन्सिंग असोसिएशन, जवाहर स्पोर्ट्स असोसिएशन, नागपूर डिस्ट्रीक्ट रोलबॉल असोसिएशन, नागपूर डिस्ट्रीक्ट स्केटिंग असोसिएशन, नागपूर वुशू असोसिएशन, मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशन, फ्यूचर जनेरशन स्पोर्ट्स, नागपूर डिस्ट्रीक्ट ज्यूडो असोसिएशन, दिव्यांग विकास आघाडी, जिम्नॅस्टिक असोसिएशन, ॲरोबिक्स अँड फिटनेस असोसिएशन, नागपूर शहर कुस्तीगीर संघटना, नागपूर डिस्ट्रीक हॉकी असोसिएशन, प्लेअर्स बास्केटबॉल जिमखाना, मिनीगोल्फ असोसिएशन, कबड्डी असोसिएशन, नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, पिट्टू असोसिएशन, लंगडी असोसिएशन, योगा असोसिएशन, रोपस्किपींग असोसिएशन, क्वान के डो मार्शल आर्ट असोसिएशन, व्हॉलिबॉल असोसिएशन.