- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : मनपातर्फे दहाही झोनमध्ये निघाली स्वच्छता जनजागृती रॅली

कचरा विलगीकरणाबाबत केली जनजागृती; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेतर्फे शनिवारी (ता. ८) दहाही झोनमध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत मनपाचे कर्मचारी तसेच स्वयंसेवी सामाजिक संस्थांनी भाग घेऊन नागरिकांना कचरा विलगीकरण करणे, सुका आणि ओला कचरा वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये गोळा करणे तसेच प्लास्टिकचा वापर बंद करण्याबात जनजागृती केली. नागरिकांनी सुद्धा या रॅलीला भरघोस प्रतिसाद दिला. यादरम्यान रॅली काढण्यात आलेल्या मार्गावरील कचरा उचलण्यात आला. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्वच्छता सर्वेक्षण नियंत्रण समिती प्रमुख भूवनेश्वरी एस, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात मनपाच्या दहाही झोनमध्ये शनिवारी (ता. ८) रॅली काढण्यात आली.

लक्ष्मीनगर झोनमध्ये सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांच्या नेतृत्व धंतोली उद्यानातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये झोनल अधिकारी रामभाऊ तिडके, झोनमधील कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. रॅलीच्या माध्यमातून धंतोली परिसरात जनजागृती करण्यात आली तसेच रस्त्यावरील प्लास्टिक कचरा उचलण्यात आला. धरमपेठ झोनमध्ये सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांच्या नेतृत्वात कॉफी हाऊस चौक येथून जनजागृती रॅली काढण्यात आली पुढे ही रॅली शिवाजी नगर, राम नगर, रवी नगर रोड आणि गोकुळपेठ मार्केट रोडपर्यंत काढण्यात आली. रॅलीत झोनल अधिकारी दीनदयाल टेंभेकर, झोनचे सर्व स्वच्छता निरीक्षक आणि ग्रीन व्हिजिल संस्थेचे प्रमुख कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, श्रिया जोगे यांच्या सह संस्थेचे २० सदस्य आणि उपस्थित होते. 

हनुमाननगर झोनमध्ये सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांच्या नेतृत्वात बेसा पॉवर हाऊस येथून जनजागृती रॅली विविध मार्गक्रमण करीत नरसाळा रोडवर रॅलीची सांगता झाली. रॅलीत झोनल अधिकारी दिनेश कालोडे आणि झोनचे कर्मचारी उपस्थित होते. धंतोली झोनमध्ये नगरसेविका लता काडगाये आणि सहाय्यक आयुक्त किरण बगडे यांच्या नेतृत्वात जनजागृती रॅली निघाली. रॅलीत झोनल अधिकारी धर्मेंद्र पाटील आणि झोनचे कर्मचारी उपस्थित होते. नेहरूनगर झोनमध्ये झोनल अधिकारी विठोबा रामटेके यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. सक्करदरा तलाव येथून जनजागृती रॅली विविध ठिकाणाहून मार्गक्रमण करीत बसेश्वर पुतळ्याजवळ संपली. रॅलीत अनेक स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. गांधीबाग झोनमध्ये सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात दोन रॅली काढण्यात आल्या. एक रॅली कोतवाली पासून बडकस चौक पर्यंत तर दुसरी रॅली सोख्ता भवन ते गांधीबाग मार्केटपर्यंत काढण्यात आली. रॅलीत झोनल अधिकारी सुरेश खरे आणि झोनचे कर्मचारी सहभागी होते. 

सतरंजीपुरा झोनमध्ये माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि सहायक आयुक्त घनश्याम पंधरे यांच्या नेतृत्वात तीन रॅली काढण्यात आल्या. पहिली रॅली राणी दुर्गावती चौक पासून, दुसरी रॅली शांतीनगर घाटपासून आणि तिसरी रॅली लालगंज मधून निघाली. रॅलीत झोनल अधिकारी राजू राजूरकर आणि झोनचे कर्मचारी सहभागी झाले होते. लकडगंज झोनमध्ये सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्या नेतृत्वात छापरु चौक ते वैष्णवदेवी चौकापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत झोनल अधिकारी बनसोडे आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. आशीनगर झोनमध्ये झोनल अधिकारी किशोर बागडे आणि रोशन जांभुळकर यांच्या नेतृत्वात वैशाली नगर बस स्थानक ते आंबेडकर उद्यान पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी झोनमध्ये सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्या नेतृत्वात जनजागृती रॅली मंगळवारी बाजार येथून निघून क्लार्क टाउन, सखाराम उद्यानपर्यंत काढण्यात आली. रॅलीत झोनल अधिकारी महेश बोकारे, झोनचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *