- Breaking News, नागपुर समाचार, विदर्भ, संत्रानगरी

नागपूर समाचार : ॲग्रोव्हिजन या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे नागपूरमध्ये उद्घाटन

हाईलाइट

  • शेती क्षेत्रात संतुलनासाठी पीक वैविध्यिकरण, तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक – कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे प्रतिपादन
  • शेतकऱ्यांना बायो- ईथेनॉल निर्मिती करावी – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

नागपूर समाचार, 24 डिसेंबर 2021 : शेती क्षेत्रात असंतुलन आहे, ते संतुलित करण्यासाठी पीक वैविध्यिकरण, तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषीला प्राधान्य दिले जात असून पंतप्रधान किसान योजना अंतर्गत देशातील 11.5 कोटी शेतक-यांना रुपये 1 लाख 62 हजार कोटी रुपये निधी दिला गेला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नागपूर येथे आज दिली.

भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असा नावलौकीक असलेल्या ‘ॲग्रोव्हिजन’ या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन देशाचे कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते आज स्थानिक कविवर्य सुरेश भट सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते, याप्रसंगी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी मंत्रालयाचे सचिव संजीव अग्रवाल, कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण मंत्री अश्वथनारायण सी. उपस्थित होते.

रेशीमबाग मैदानात 24 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजित या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात 350 दालने, कृषी प्रदर्शनाचे 6 दालन तसेच कृषी कार्यशाळेचे 2 दालन राहणार असून या वर्षीच्या कृषी प्रदर्शनाची संकल्पना ‘समृद्ध शेतीसाठी नवे तंत्रज्ञान’ अशी आहे. या प्रदर्शनात, विदर्भात डेअरी उद्योगाचा विकास, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन राष्ट्रीय अशा विविध विषयावर परिसंवाद तसेच परिषद होणार आहे. शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, दुग्धव्यवसाय विकास परिषद तसंच राष्ट्रीय कृषी प्रदर्शन सुद्धा या चार दिवसीय प्रदर्शनामध्ये होईल. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत हे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन जनतेकरीता रेशीमबाग मैदान येथे खुले राहणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने पाम तेल अभियानाला मान्यता दिल्यानंतर ईशान्य भारतातील नऊ लाख हेक्‍टर जमिनीवर त्याची लागवड होत आहे यामुळे ईशान्य भारताचे सशक्तीकरण सोबतच खाद्यतेलाची गरज सुद्धा पूर्ण होत आहे. कृषीच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे तोमर यांनी यावेळी नमुद केले. सध्या कृषी क्षेत्रामध्ये शासकीय खरेदी ,खत बियाणे कीटकनाशकं साठी अनुदान अशा सर्व शासकीय योजनांचा निधी समाविष्ट आहे.

कृषी क्षेत्रांमध्ये संरचनात्मक निधीसाठी एक लाख कोटी रुपयाचा निधी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारने मंजूर केला होता. या अंतर्गत आता गावस्तरावर सुद्धा वेअर हाऊस, शीतसाखळी यासारख्या सुविधा निर्माण होत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांनी विक्रमी पीक उत्पादन घेतलं खरिपाचा सुद्धा हंगाम चांगला काढला असे त्यांनी सांगितलं. नॅनो युरिया यासारख्या नवीन खतफवारणीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. शेतकर्‍यांनी जैविक शेतीच्या दिशेने वळले पाहिजे असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.

पेट्रोलियम तसेच इंधन यावर आयातीचा खर्च हा 10 हजार कोटींच्या वर असून याला पर्याय म्हणून पर्यावरण सक्षम, किफायतशीर असे बायोइथेनॉलची गरज असल्याची नितीन गडकरी यांनी सांगितले. यापुढे पेट्रोलवर चालणाऱ्या सर्व कार गाड्यांमध्ये फ्लेक्स इंजिनची सुविधा राहणार असून यामुळे वाहनांची किंमत बदलणार नाही. शंभर टक्के बायोइथेनॉल वर चालणाऱ्या गाड्यामूळे शेतकऱ्यांना ईथेनॉलची पंप टाकण्याची संधी मिळणार असून त्यांच्या जिवनात आर्थिक परिवर्तन घडेल असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितल. विदर्भात 50 लाख लिटर दुध उत्पादनाचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी राज्य शासनाच्या योजना , वेटरनरी क्लिनीक तसेच एम्ब्रियो लॅब या नागपूरात असणा-या सुविधांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण मंत्री अश्वथनारायण सी. यांनी शेतक-यांमध्ये जनजागृती तसेच शेतीच्या प्रगतीसाठी प्रगत तंत्रज्ञान तसेच सर्वोत्कृष्ठ उपक्रम यांची गरज असल्याचे सांगितले, कर्नाटकमध्ये अशा अद्यायावत तंत्रज्ञानाने शेतकरी उत्पादक संघ तसेच स्टार्ट अ‍प कृषी क्षेत्रात चांगली कामगिरी करत असल्याच त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅग्रोव्हिजनचे आयोजन सचिव रवि बोरटकर तर आभार प्रदर्शन रमेश मानकर यांनी केले. या कार्यक्रमाला शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *