- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

माजी महापौर नंदा जिचकार, फिल्म गुरू समर नखाते यांची उपस्थिती

नागपूर समाचार, ता. १८ : नागपूर महानगरपालिका, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने व सप्तक, पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय पाचव्या ‘ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चे शनिवारी (ता.१८) माजी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी फिल्म गुरू समर नखाते, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर मेश्राम, ‘गोत’ चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे, ‘फिरस्त्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक पुणे येथे आयकर अधिकारी म्हणून कार्यरत विठ्ठल भोसले उपस्थित होते.

गायत्री नगर, आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीम लिमीटेडच्या कविकुलगुरू कालीदास सभागृहामध्ये शनिवार १८ डिसेंबर व रविवार १९ डिसेंबर हे दोन दिवस विविध चित्रपटांचे सादरीकरण आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना माजी महापौर नंदा जिचकार यांनी ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांच्या कार्याचा गौरव केला. २०१७ ला महापौर असताना नागपूर शहरात ‘ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ची सुरूवात झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. डॉ. चंद्रशेखर मेश्राम हे स्वत:च आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी अशा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पुढाकार घेणे ही शहरासाठी गौरवास्पद बाब असल्याचेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकामध्ये ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी महोत्सवाची संकल्पना विषद केली. महोत्सवाच्या पहिल्या वर्षापासून नागपूर महानगरपालिकेचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. देशविदेशातील हजारांवर चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट आठ चित्रपटांची या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. तरुणांना शिक्षित करण्यासह त्यांना प्रोत्साहित करणे त्यांच्यातील प्रतीभेला वाव मिळावा, हा सुद्धा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील वर्षी या महोत्सवाचे आयोजन होऊ शकले नाही. मात्र मार्च २०२२मध्ये सहाव्या ‘ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्याचा मानस डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी यावेळी व्यक्त केला.

फिल्म गुरू समर नखाते यांनी चित्रपट, कथा, दिग्दर्शन, अभिनय या सर्व बाबींच्या बारकाव्यांवर मार्गदर्शन करीत संवाद साधला.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (ता.१८) सादर झालेल्या ‘गोत’ या चित्रपटाच्या चमूचा माजी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘गोत’चे निर्माता, दिग्दर्शक शैलेंद्र बागडे, किरण बागडे, विजय रामटेके, पूजा पिंपळकर, सचिन गिरी या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय रविवारी (ता.१९) सादर होणाऱ्या ‘फिरस्त्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विठ्ठल भोसले यांचाही सत्कार करण्यात आला. विठ्ठल भोसले हे पुणे येथे आयकर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रश्मी पारस्कर सोवनी यांनी केले. आभार डॉ.उदय ब्रम्हे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *