- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : मनपाद्वारे १५ डिसेंबर पासून विलगीकृत नसलेला कचरा स्वीकारल्या जाणार नाही

मनपा आयुक्तांनी दिले निर्देश; नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करणाऱ्या गाडीत ओला आणि सुका कचऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र काही नागरिक घरातील कचऱ्याचे विलगिकरण न करताच स्वच्छता दूताकडे देतात. त्यामुळे मनपाद्वारे ओला आणि सुका कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. १५ डिसेंबर पासून विलगीकृत नसलेला कचरा नागरिकांकडून स्वीकारू नका, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी (ता. ११) स्वच्छता विभागाला दिले. तसेच नागरिकांनी सुद्धा आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करूनच द्यावा, असे आवाहनही यावेळी मनपा आयुक्तांनी केले.

नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून स्वच्छता दूताकडे द्यावा, असे निवेदन मनपातर्फे वेळोवेळी करण्यात आले होते. तरीसुद्धा नागरिकांकडून स्वच्छता दूताला मिश्रीत कचरा दिला जात आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने आता फक्त सुका आणि ओला असा वेगवेगळा केलेला कचरा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

ओल्या कचऱ्यामध्ये खराब फळे, भाज्या, उरलेले अन्न, अंड्याचे कवच, नारळ, शहाळी, हाडे अशा विघटन होणाऱ्या बाबीचा समावेश होतो. तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टीक पिशव्या, रबर, थर्माकॉल, काचेच्या बाटल्या तसेच काच, बॅटरी सेल, धातू, खिळे अशा गाष्टीचा समावेश होतो. कचरा संकलन करणाऱ्या गाडीला निळा आणि हिरव्या रंगाचे असे दोन टब लावलेले आहेत. निळ्या रंगाच्या टबमध्ये सुका कचरा तर हिरव्या रंगाच्या टबमध्ये ओला कचरा टाकावा.

पालिका क्षेत्रातील सोसायट्या, हॉटेल, व्यापारी संस्था तसेच नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी ओला कचरा प्लास्टिक पिशवीमध्ये न देता ओला व सुका कचरा विलगिकरण मोहीमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

घरोघरी लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती यांच्याकरिता वापरले जाणारे डायपर्स, सॅनिटरी नॅपकीन, बॅटरी सेल, रंगाचे डबे, केमिकल स्प्रे, जंतुनाशके, औषधांच्या रिकाम्या बाटल्या अशा प्रकारच्या घातक कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा कचऱ्यामुळे पर्यावरणाची मोठया प्रमाणावर होणारी हानी टाळण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने विघातक असलेल्या घरगुती घातक कचऱ्याचे ओला व सुका या व्यतिरिक्त स्वतंत्र संकलन करण्यात येऊन त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचे महानगरपालिकेने निश्चित केले आहे. आशा प्रकारचा कचरा वेगळ्या लाल रंगाच्या बकेट मध्ये गोळा करण्याचे आवाहन सुद्धा मनपातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *