- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपूर समाचार : वंदे मातरम् हेल्थ पोस्टच्या संचालनासाठी सामाजिक संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद

महापौरांनी घेतली संस्थांच्या पदाधिका-यांसोबत बैठक

नागपूर समाचार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘आझादी-७५’ अंतर्गत महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये विविध भागांमध्ये ७५ वंदे मातरम् हेल्थ पोस्ट तयार करण्यात येत आहेत. यापैकी काही पूर्णत्वास आले असून या वंदे मातरम् हेल्थ पोस्टच्या संचालनासाठी सामाजिक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. मंगळवारी (ता.२६) महापौर दयाशंकर तिवारी यांनी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेउन यासंदर्भात चर्चा केली. यावेळी संस्थांद्वारे मनपाला संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये महापौरांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रारंभी महापौर दयाशंकर तिवारी यांनी वंदे मातरम् हेल्थ पोस्टची संकल्पना विषद केली. नागपूर शहरातील झोपडपट्टी भागांमध्ये प्राथमिक आरोग्याची सुविधा असावी यादृष्टीने शहरातील ठिकाणे अधोरेखित करून तिथे वंदे मातरम् हेल्थ पोस्ट तयार करण्यात येत आहेत. या हेल्थ पोस्टवर नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा अगदी नाममात्र १० रुपये शुल्क घेउन दिली जावी ही संकल्पना आहे. या हेल्थ पोस्टसाठी आवश्यक जागा, वीज, पाणी ही संपूर्ण व्यवस्था नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. येथे आरोग्य सुविधेसाठी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, औषधे आणि देखरेख ही व्यवस्था संबंधित संस्थेला करायची आहे, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सांगितले.

शहरातील झोपडपट्टी भागात राहणा-या गोरगरीब जनतेला प्राथमिक आरोग्य सुविधेसाठी दूरदूरपर्यंत जावे लागते. त्यांना त्यांच्या परिसरामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास अनेकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार आहे. मनपाचे वंदे मातरम् हेल्थ पोस्ट हे सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सामाजिक संस्थांनी संचालित करण्यास पुढाकार घेतल्यास जास्तीत नागरिकांपर्यंत या संस्थांच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य सुविधा पोहोचविता येउ शकणार आहे. शहरातील सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने लवकरच वंदे मातरम् हेल्थ पोस्ट नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू होतील, असा विश्वासही यावेळी महापौरांनी व्यक्त केला.

नागपूर शहरातील गोरगरीब जनतेच्या सुविधेच्या दृष्टीने वंदे मातरम् हेल्थ पोस्ट ही उत्कृष्ट संकल्पना असून यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याचे यावेळी उपस्थित संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *