- नागपुर समाचार, मनपा

शहरात १ लाखावर गणेश मूर्तींचे विसर्जन  १२७.६८ टन निर्माल्य संकलन : २७० कृत्रिम तलावांसह फिरत्या विसर्जन कुंडांमध्ये नागरिकांनी दिला श्रीगणेशाला निरोप : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

नागपूर, ता. २० : गणेशोत्सवानिमित्त नागपूर शहरामध्ये दहाही झोन अंतर्गत १ लाख २७ हजार ७७६ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मनपातर्फे व्यवस्था करण्यात आलेल्या कृत्रिम तलाव आणि फिरते विसर्जन कुंडांमध्ये नागरिकांनी श्रीगणेशाचे विसर्जन केले. याशिवाय काही नागरिकांनी घरीच मूर्तींचे विसर्जन केले. शहरातील मूर्ती विजर्सनासह मनपाद्वारे १२७.६८ टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून विजर्सन कुंडांमध्ये श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याच्या मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नियमांचे पालन करून सामंजस्य दाखविल्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूरकरांचे कौतुक करीत आभारही मानले आहेत.

            पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाद्वारे शहरातील सर्व तलावांवर गणेश विसर्जनास बंदी करण्यात आली. त्यादृष्टीने तलावांना टिनाचे शेड लावून बंद करण्यात आले. त्याऐवजी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळी मनपातर्फे कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली. यासोबतच नागरिकांना त्यांच्या दारापुढे, परिसरात श्रीगणेशाचे विसर्जन करता यावे याकरिता फिरते विसर्जन कुंडाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. फिरत्या विसर्जन कुंडाच्या उपलब्धतेकरिता मनपाद्वारे झोनस्तरीय संपर्क क्रमांक सुद्धा जारी करण्यात आले होते. नागरिकांनी मनपाच्या या सुविधेचा लाभ घेत मनपाच्या कर्मचा-यांशी संपर्क साधून फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून घेतले व त्यामध्ये श्रींच्या मूर्तीचे विजर्सन केले. याशिवाय अनेकांनी घरगुती मूर्तींचे घरीच विसर्जन करीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवात आपले अमूल्य योगदान दिले.

            श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी नागपूर शहरात दहाही झोन अंतर्गत २७० कृत्रिम विजर्सन तलावांची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये मातीच्या १ लाख २० हजार ९९१ मूर्तीं तर ६७८५ पीओपी मूर्ती अशा एकूण १ लाख २७ हजार ७७६ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. केंद्र शासनाने पीओपी मूर्तींची खरेदी, विक्री व आयातीवर बंदी आणल्यानंतर नागपूर शहरामध्ये पीओपी मूर्ती विरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत अनेक दुकानांवर कारवाई करीत ते सील सुद्धा करण्यात आले. विजर्सनानंतर पीओपी मूर्तींची संख्या पुढे आली. यासंदर्भात मनपाद्वारे पुढेही कारवाई सुरू राहणार असून पूर्णत: ‘पीओपी फ्री’ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपा प्रशासन कार्य करणार असल्याचे, मनपा प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *