- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार

के.टी. नगर येथे मनपाचे १०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय सुरु

नागपूर, ता. २७ :  नागपूर महानगरपालिकेतर्फे संचालित के.टी.नगर रुग्णालय येथे १०० खाटांच्या कोव्हिड रुग्णालयाचे उदघाटन केन्द्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्ष नेता श्री. देवेन्द्र फडणवीस व महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते मंगळवारी (२७ एप्रिल) करण्यात आले.

            के.टी.नगर येथे कोव्हिड रुग्णालय सुरु करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होता. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या प्रयत्नामुळे आमदार श्री.विकास ठाकरे, नगरसेवक श्री. हरीश ग्वालबंशी व नगरसेवक श्री.विक्रम ग्वालबंशी यांनी स्थानिक नागरिकांची समजूत घालून त्यांना रुग्णालय सुरु करण्याची निकड समजवून हे रुग्णालय उघडण्यासाठी तयार केले. परिसराचे नागरिकांसाठी ही मोठी सोय उपलब्ध झाली आहे. रुग्णालयाची इमारत मनपाची आहे तसेच डॉक्टर्स, नर्सेस व अन्य स्टाफची व्यवस्था सुध्दा मनपा मार्फत करण्यात आली आहे. तसेच जेवणाची, औषधी व अन्य सुविधा मनपातर्फे नि:शुल्क करण्यात आली आहे. रुग्णालयाचे संचालनाची व्यवस्था श्री. रमेश फुके (पाटिल) चॅरिटेबल ट्रस्ट कडे देण्यात आली आहे. आमदार डॉ.परिणय फुके व त्यांचे सहकारी संचालनात मदत करतील.

            याप्रसंगी बोलतांना नितिन गडकरी म्हणाले की नागपूर येथे कोव्हिड रुग्णांना अधिकाधिक सोयी उपलब्ध व्हाव्या म्हणून अनेक सामाजिक संस्था आपली सेवा देत आहेत. याचाच भाग म्हणून सामाजिक दृष्टिकोन ठेवत मनपा व फुके यांनी एक चांगले कार्य हाती घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

            देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या सर्व सोयीने युक्त अशा मनपाच्या कोव्हिड सेंटर ची सेवा रुग्णांनी घ्यावी. यामध्ये सेवा देणाऱ्या मनपाच्या सर्व डॉक्टर, परिचारिका व संस्थेचे पदाधिकारी यांचीत्यांनी प्रशंसा केली.

            याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सुध्दा कोव्हिड सेंटरबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मनपा तर्फे कोव्हिड रुग्णालय नागरिकांच्या सेवेत रुजू होत आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

यावेळी आमदार डॉ. परिणय फुके यांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नितीनजी गडकरी यांच्याकडे केली असता पाठपुरावा करून जास्तीत जास्त सिलेंडर उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

            यावेळी उपमहापौर श्रीमती मनीषाताई धावडे, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेताश्री.अविनाश ठाकरे, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, आरोग्य सभापती श्री. संजय महाजन,धरमपेठ झोन सभापती श्री.सुनील हिरणवार,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर,उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, सहाय्यक आयुक्त श्री.प्रकाश वराडे, नगरसेविका श्रीमती मायाताई इवनातेव श्रीमती दर्शनाताई धवड, नगरसेवक श्री. विक्रम ग्वालबंशी, नगरसेवक श्री. अमर बागडे, भाजपा ओबीसी आघाडी नागपूर अध्यक्ष रमेश चोपडे,चॅरिटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री. प्रवीण जैन,सहसचिव श्री. नितीन फुके, ट्रस्टच्या कोषाध्यक्ष तथा नगरसेविका डॉ. परिणीता फुके, डॉक्टर,परिचारिका उपस्थित होते.

             ह्या ‘कोव्हिड सेंटरवर’ जे कोविड पॉझिटिव्ह आणि सौम्य लक्षणे आहेत,  ज्यांचा CT Scan Score 8 चे खाली असेल तसेच Oxygenलेव्हल 92 पेक्षावरती असेल त्यांना ॲडमिट करून घेतले जाईल. रुग्णास दाखल करुन घ्यायचा निर्णय योग्य तपासणीनंतर सर्वस्वी ‘कोव्हिड सेंटर’ वरील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होईल.

            रुग्णांची मनस्थिती सकारात्मक रहावी ह्यासाठी समुपदेशन इत्यादीचे  नियोजन ‘कोव्हिड सेंटर’ मध्ये संस्थेचे वतीने  केलेले आहे.नागरिकांनी ‘कोव्हीड केअर सेंटर’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी 9021336037 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा सेंटरवर जावे, असे आवाहन मनपा व ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *