- नागपुर समाचार, मनपा

तीन दिवसात सुरेश भट सभागृहाची फायर ऑडिट संबंधी कार्यवाही पुर्ण करा : महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश. सभागृहाच्या दुरूस्ती आणि व्‍यवस्थे संदर्भात घेतला आढावा

नागपूर: रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृहाचे वर्ष उलटूनही अद्याप वार्षिक देखभाल दुरुस्तीबाबत विद्युत विभागाकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे सभागृहाचे अद्यापही फायर ऑडिट झाले नाही. यावर नाराजी व्‍यक्त करत महापौर दयाशंकर तिवारी यांनी तीन दिवसात कविवर्य सुरेश भट सभागृहाची फायर ऑडिट संबंधित आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. फायर ऑडिट संबंधी बी-फॉर्म पुढील तीन दिवसात अग्निशमन विभागाला न दिल्यास स्वत: सभागृह सील करणार, असा इशाराही महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिला. सोमवारी (ता. १५) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सभागृहाच्या व्‍यवस्था व दुरूस्ती संदर्भात बैठक पार पडली. यावेळी महापौर बोलत होते.

बैठकीत उपमहापौर मनिषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद तभाने, अधिक्षक अभियंता अजय पोहेकर, हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, उप अभियंता कृष्णकुमार हेडाऊ, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, कनिष्ठ अभीयंता नितीन झाडे, अग्निशमन विभागाचे सुनिल डोकरे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता पी.के. रुद्रकार, स्पिक ॲन्ड स्पॅन कंपनीचे शशीकांत मानापुरे, आर्किटेक्ट अशोक मोखा तर्फे महेश निराटकर, सुरेश भट सभागृहाचे अजय परसतवार, राहुल गायकी, जितेन्द्र गायकवाड आदी उपस्थित होते.

भट सभागृहातील उपलब्ध सोयी साधनांचा महसूल वाढीसाठी उपयोग करा
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कविवर्य सुरेश भट सभागृहात अनेक सोयी साधने उपलब्ध आहेत. या साधनांचा योग्य तऱ्हेने उपयोग केल्यास मनपाच्या महसूलात वाढ होईल. या सभागृहात पार्किंग साठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. या जागेचा उपयोग शहरातील मोठ्या कार कंपन्यांच्या कार प्रदर्शनासाठी देण्यात यावा व तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले. तसेच कार प्रदर्शनीसाठी जागा उपलब्ध असल्याची मार्केटींग सुध्दा करण्यात यावी अशी सूचनाही यावेळी महापौरांनी केली. यासोबतच सभागृहाच्या पार्किंगमध्ये मोठा हॉल आहे या हॉलसुध्दा कपड्यांचे, होम डेकोर, तसेच विविध वस्तूंच्या प्रदर्शनी भरविण्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग तत्वावर उपलब्ध करून देण्यात यावा असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.

महापौर दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यक्रमाच्या वेळी तंबाकुजन्य पदार्धाचे सेवन करुन इतरत्र थुंकल्यामुळे परिसर अस्वच्छ होतो. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करण्यासाठी एक व्‍यक्ती ठेवण्यात यावा. तसेच सभागृहाच्या देखभालीसाठी संबंधित अधिकाऱ्यांची ड्यूटी लिस्ट तयार करून प्रत्येकाची जबाबदारी वाटून देण्यात यावी असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. सभागृहात लावण्यात येणाऱ्या सिसिटीव्‍ही कॅमेऱ्याची मॉनिटर स्क्रिन व्हीआयपी रूममध्ये तसेच सुरक्षा कक्षात लावण्यात यावी. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरसुध्दा मॉनिटरींग दिसण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचनाही यावेळी महापौरांनी केल्या.

तसेच कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या वरच्या भागातील विशाल भींतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक प्रसंगाचे चित्र रेखाटण्याचा मानस नागपूरातील एका चित्रकाराने व्यक्त केला आहे. तरी त्या संबंधाने पुढील योग्य ती कार्यवाही लवकरात-लवकर करावी, असेही निर्देश महापौरांनी दिले.

गुढीपाडव्‍यापर्यंत फूड झोन सुरू करण्याचे निर्देश
कविवर्य सुरेश भट सभागृत फूड झोनसाठी जागा प्रस्तावित आहे. त्यामुळे या प्रस्तावित जागेवर गुढीपाडव्‍यापर्यंत फूड झोन सुरू करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महापौर दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, संबंधित फूड झोन मध्ये विक्री करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर मनपाद्वारे निश्चित करण्यात येतील. संबंधित संस्थेस मनपाने निश्चित केलेल्या दराने खाद्यपदार्थांची विक्री करने बंधनकारक राहिल असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *