- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : मनपाच्या माध्यमातून आठ हजार पथविक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज मंजुर

‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ : डिजिटल व्यवहारातूनही मिळणार आर्थिक लाभ

नागपूर : कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या लॉकडाउनमध्ये पथविक्रेत्यांचे (हॉकर्स) व्यवसाय बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली. पथविक्रेत्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे ८२५५ पथविक्रेत्यांना १० हजार रुपये खेळते भांडवल कर्ज मंजुर झालेले आहे. यापैकी ५४३२ पथविक्रेत्यांना कर्जाचे वितरणही करण्यात आले आहे. शनिवारी (ता.१९) रेशीमबाग येथील मनपाच्या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये पथविक्रेत्यांसाठी झालेल्या सभारंभामध्ये मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त प्रकाश वराडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक पंकज देशमुख उपस्थित होते. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्या हस्ते कर्ज मंजुर झालेल्या पथविक्रेत्यांना मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले.

सभागृह परिसरामध्ये विविध राष्ट्रीयकृत बँकांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवरून पथविक्रेत्यांच्या अडचणी सोडवून त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय डिजिटल व्यवहाराचीही माहिती बँकांच्या प्रतिनिधीमार्फत पथविक्रेत्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे, डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून पथविक्रेत्यांना वर्षाला १२०० रुपये कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यात मिळालेले १० हजार रुपये खेळते भांडवली कर्जाची नियमित परतफेड केल्यास पुढील वेळी २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतही कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड केल्यास व्याजामध्ये ७ टक्के अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. यासाठी बँकांद्वारे पथविक्रेत्यांना ‘क्यूआर कोड’ वितरित करण्यात आले आहे.

शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नागपूर महानगपालिकेद्वारे दहाही झोनमध्ये विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे. ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी www.pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर किंवा मनपाच्या संबंधित झोन कार्यालयात संपर्क साधावा. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनपाचे शहर अभियान व्यवस्थापक रितेश बांते, प्रमोद खोब्रागडे, नूतन मोरे, विनय त्रिकोलवार यांच्यासह सर्व समूह संघटकांनी सहकार्य केले.

नागपूर महानगरपालिका राज्यात दुसऱ्या स्थानावर

केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ या विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी राज्य शासनाच्या निर्देशान्वये नागपूर महानगरपालिकेमध्ये करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे आजघडीला एकूण २१ हजार १४१ अर्ज भरण्यात आले. यापैकी ८ हजार २५५ अर्ज मंजुर झाले असून ५ हजार ४३२ पथविक्रेत्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. अर्ज मंजुरी आणि वितरणामध्ये नागपूर महानगरपालिका महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे तर अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये मनपा तिसऱ्या स्थानी आहे, हे विशेष.

पथविक्रेत्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

समारंभामध्ये मनपाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवर आणि पथविक्रेत्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी मनपाचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ.प्रदीप दासरवार उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी स्वच्छतेप्रति सजग राहून त्यासाठी वेळ देणे, दरवर्षी १०० तास म्हणजे आठवड्याला दोन तास श्रमदान करणे, घाण न पसरविणे व कुणालाही पसरवू न देणे, स्वत:सह इतरांनाही श्रमदानासाठी प्रोत्साहित करणे याबाबत शपथ ग्रहण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *