- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : एकत्रित काम करून शहराला स्वच्छ बनवू; महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे स्वयंसेवी संस्थांना आवाहन

5 ते 21 जूनपर्यंत पर्यावरण व स्वच्छता पंधरवाड्यात विशेष अभियान

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून ‘पर्यावरण दिना’पासून ते 21 जून ‘योग दिना’पर्यंत ‘पर्यावरण व स्वच्छता पंधरवाडा’ साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून, यादरम्यान नागरिक, पदाधिकारी, विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्यातून स्वच्छतेची विशेष मोहीम (ड्राईव्ह) राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या अभियानात स्वयंसेवी संस्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच एकत्रित काम करून शहराला स्वच्छ बनवू यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक जाणिवेतून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना केले.

शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आज (ता. 2) डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी महापौर श्रीमती ठाकरे होत्या.

बैठकीत स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी-वखरे, सत्ता पक्ष नेता श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान संवर्धक श्री. अमोल चौरपगार,क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर मनपाचे झोनल स्वच्छता अधिकारी यांच्यासह मनपाचे ब्रॅड ॲम्बसेडर आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे श्री. कौस्तव चॅटर्जी, मनपाचे ब्रॅड ॲम्बसेडर व तेजस्विनी महिला मंचच्या श्रीमती किरण मुंदडा, श्रीमती आंचल वर्मा ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे स्वयंसवेक कु. सुरभी जैयस्वाल,तसेच सर्वश्री विवेक रानडे, श्रीमती इंद्रायणी ठाकरे, डॉ. रवींद्र भुसारी, डॉ. शालीनी, डॉ. अजय पोहारकर, श्री.अशोक माटे, श्री. नुकुल अग्रवाल, श्रीमती जोस्तना कामडी, श्रीमती शुभांगी पडोळे, श्री. जयंत पाठक यांच्यासह इतर स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकातर्फे 5 जून रोजी वृक्षारोपण, 6 जून रोजी तलावाची सफाई, 7 जून रोजी सायकल रॅली, 8 जून रोजी उद्यानाची स्वच्छता, 9 जून रोजी मैदानाची स्वच्छता, 10 जून रोजी धार्मिक स्थळाची स्वच्छता, 11 जून रोजी बाजार, वाणिज्य , मॉल, मंडी यांची स्वच्छता, 12 जून रोजी घाटांची स्वच्छता, 13 जून रोजी वाहनतळाची स्वच्छता, 14 जून रोजी ई-वेस्ट गोळा करण्याची विशेष मोहिम, 15 जून रोजी रुग्णालयाची स्वच्छता, 16 जून रोजी सोसायटी, मोहल्ला, रहिवासी क्षेत्राची स्वच्छता, 17 जून रोजी हेरिटेज प्लेस, टूरिस्ट प्लेस स्वच्छता, 18 जून रोजी वस्त्यांची स्वच्छता, 19 जून रोजी बीडब्ल्यूजी वर्कशॉप, चित्रकला स्पर्धा, सौंदर्यीकरण कामे, 20 जून रोजी योगा केंद्राची स्वच्छता, चित्रकला स्पर्धा, सौंदर्यीकरण कामे, 21 जून रोजी आंतराष्ट्रीय योगा दिन साजरा करून या विशेष स्वच्छता मोहिमेत भाग घेतलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे याबाबत स्थायी समिती सभापती श्रीमती शिवाणी दाणी यांनी माहिती दिली.

यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे म्हणाल्या की, मनपातर्फे 5 जून ते 21 जून या पंधरवाड्यात विशेष जनजागृती अभियानाच्या माध्यमातून नागपूर शहराला स्वच्छतेच्या रॅकमध्ये वर आणण्याकरिता आणि नागपूर शहर स्वच्छ राखण्यासाठी, पर्यावरण दृष्ट्या शहराला अधिक चांगले करण्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मोठी मदत होणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असे आवाहन महापौरांनी केले. यावेळी विविध स्वयंसेवी संस्थांनी आपल्या सूचना बैठकीत मांडल्या. यावर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या सूचनांवर मनपा नक्कीच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी स्थायी समिती सभापती यांनी स्थानिक नगरसेवक, एनजीओ यांच्या सहकार्याने 5 जून पासून सुरु होणाऱ्या विशेष स्वच्छता अभियानात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह मोहिमेत 1 किलो प्लास्टिक मनपाला द्या अशी योजना अंमलात आणली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच या मोहिमेमध्ये एनसीसी, एनएसएस, नागपूर विद्यापीठाची मदत घेतली जाणार आहे. शिवाय स्वयंसेवी संस्था ज्या ज्या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत त्याबाबत मनपाला माहिती देण्यात यावी, त्या सूचना त्यांनी संस्थांना केल्या या सूचनानुसार मनपा कार्यवाही करेल असेही त्यांनी आश्वासन यावेळी दिले.

यावेळी सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर म्हणाले की, 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात पर्यावरण दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला वृक्षारोपणाची मोठे अभियान राबविण्यात यावे अशाही सूचना त्यांनी केल्या.