- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भिवापूर येथील मदत कार्याची केली पाहणी

शासन तात्काळ मदत देते हा विश्वास दृढ झाला – सरपंच वैशाली चौधरी 

मुख्यमंत्री सहायता निधीतून दिली जाणार मदत; बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागपूर समाचार : अचानक लागलेल्या आगीने आमचे पूर्ण गाव भयभीत झाले होते. शासन तात्काळ गावात पोहोचले. मदत कार्य वेगात सुरु झाले. झालेल्या घटनेच्या भितीतून आता आम्ही गावकरी पुन्हा विश्वासाने उभे झाले आहोत. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच जनावरांना चाराही दाखल झाला. पशु वैद्यकीय विभागाची टीम पोहोचली. सकाळपासून पंचनामे सुरु झाले. किराणा साहित्य व जीवनावश्यक साहित्य गावात पोहोचले. शासनासमवेत लोकसहभागाचा प्रत्यय आला. शेजारची मल्हारपूर, खोलडुडा या गावांनी कुटार आणि कडबा पाठवून दिला. शासन तात्काळ मदत करु शकते याचा प्रत्यय आम्ही धामणगाववासीयांनी घेतल्याचे सरपंच वैशाली चौधरी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज धामणगाव येथे मदत कार्याची पूर्ण पाहणी करुन येथील हनुमान मंदीरात घेतलेल्या आढावा बैठकीत सारे गाव सहभागी झाले होते. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण, सरपंच वैशालीताई चौधरी, माजी सरपंच योगेश डफरे व इतर अधिकारी उपस्थित होते. शासनातर्फे विविध विभागाच्यावतीने आतापर्यंत नुकसानग्रस्त गावकऱ्यांपर्यंत पोहोचविलेल्या मदतीची माहिती देऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खातरजमा करुन घेतली. आजवर दिलेल्या मदतीसह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण माहिती घेतली असून मुख्यमंत्री साहयता निधीद्वारे वेगळी मदत देत असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. या बैठकीत गावकऱ्यांच्या विविध अडचणी ऐकूण घेत त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

शासनाने तत्पर मदत पोहोचविल्याने आता ज्यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यांनी घराचे काम सुरु केले आहे. उषा तायवाडे, शरद राऊत व इतर बाधितांनी आज आपल्या घराचा पाया खोदून प्रारंभ केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सतत संपर्क ठेवून प्रशासनासोबत गावाला जोडून ठेवल्याबद्दल सरपंच वैशाली चौधरी यांनी समाधान व्यक्त केले. 

खत व बी-बियाणे पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश

शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या बी-बियाणे व खत निविष्ठांची कमतरता पडू नये याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उमरेड येथे आढावा बैठकीत दिले. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी, कृषी अधिकारी यांनी दक्षता घेऊन वेळोवेळी खत विक्रेत्या आस्थापनांना भेटी देऊन पाहणी करण्याचे त्यांनी सांगितले. भिवापूर तालुक्यातील मौजा रानमांगली येथे कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी लक्ष्मण दडमल यांच्या शेतावर त्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतात केलेल्या विविध सेंद्रीय शेतीच्या प्रयोगाची माहिती घेऊन विक्री व्यवस्थापन याबाबत चर्चा केली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी कुमारी भोपळे, प्रगतशील शेतकरी विजय वर्मन, आनंदराव दडमल, ज्ञानेश्वर गजबे, किशोर भुडे आदी उपस्थित होते.