नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि विद्युत सभापती सौ. रुपाली परशू ठाकूर यांनी शहरातील खाजगी रुग्णालयांच्या सुरक्षेची गंभीर दखल घेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत अग्निशमन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र (NOC) न घेता सुरू असलेल्या रुग्णालयांवर तसेच इतर धोकादायक ठिकाणांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
यामध्ये मोठ्या रहिवासी इमारती, रूफटॉप हॉटेल्स, ट्युशन क्लासेस, बार आदी ठिकाणी अग्निसुरक्षेची पूर्ण तपासणी करण्यावर भर देण्यात आला. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी अग्निशमन विभागाने विशेष मोहिम राबवावी, असेही निर्देश देण्यात आले.
तसेच नगररचना विभागाकडून इमारत नकाशा मंजुरी प्रक्रियेबाबतही ठोस निर्णय घेण्यात आले. यापुढे अग्निशमन व नगररचना या दोन्ही विभागांच्या संयुक्त परवानगीनंतरच नाहरकत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या बैठकीस अग्निशमन विभागाचे अधिकारी, सर्व स्टेशन इन्चार्ज तसेच नगररचना विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभापतींच्या आदेशानुसार लवकरच या विषयावर व्यापक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.




