- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक धरोहराला चालना देण्यासाठी कुंवारा भिवसेन महोत्सव – वित्त व नियोजन राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल

कुंवरा भीमसेन आदिवासी लोककला सांस्कृतिक प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

आज १९ एप्रिल रोजी पद्मश्री सन्मानित प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचे द्रौपदी महानाट्य

नागपूर समाचार : आदिवासी समाजाने आजही आपली नाळ मूळ सांस्कृतिक धरोहराशी तुटू दिली नाही. आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा त्यांनी जतन करून ठेवला आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण घरकुल पासून वीजेच्या सेवासुविधा पर्यंत, शिक्षणापासून स्वयंरोजगारापर्यंत विविध योजना पोहोचविल्या आहेत. यात कालपरत्वे भर घालून आता सौर ऊर्जासारख्या नव्या योजनांची जोड देत आहोत.

भौतिक विकाससमवेत त्यांनी जपलेल्या सांस्कृतिक कला परंपरांना चालना देण्यासाठी पारशिवणी येथे आपण तीन दिवसीय ‘कुंवरा भीमसेन आदिवासी लोककला सांस्कृतिक प्रदर्शनीचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन वित्त व नियोजन राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी केले. 

पारशिवणी येथे आयोजित तीन दिवसीय ‘कुंवरा भीमसेन आदिवासी लोककला सांस्कृतिक प्रदर्शनीचे’ थाटात उद्घाटन समारंभात राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन त्यांनी उपस्थित आदिवासी आदिवासी बांधवांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले.

आज सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध पारंपरिक आदिवासी नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले. गेंडी नृत्य, खापरी नृत्य, बैगा कर्मा नृत्य तसेच सोंगी मुखवटे या कलाप्रकारांचे सादरीकरण आदिवासी कलाकारांनी केले.

याचबरोबर विशेष आकर्षण होते ते इंडियन आयडल फेम प्रसिद्ध गायिका शन्मुखा प्रिया हिचे. तिने हिंदी चित्रपटातील गीते सादर करून श्रोत्यांना ठेका धरायला लावला. मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

आज दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी पद्मश्री सन्मानित प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी द्रौपदी महानाट्य हा नृत्य कार्यक्रम सादर करणार आहेत.