- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : कोरोना पॉझिटिव्ह असतानाही कार्यालयातून फाईल व बिले बोलावून केली स्वाक्षरी – महापालिकेत खळबळ

कोरोना पॉझिटिव्ह असतानाही कार्यालयातून फाईल व बिले बोलावून केली स्वाक्षरी – महापालिकेत खळबळ

नागपूर : ६ डिसेंबर – मनपाच्या विद्युत विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता करोना पॉझिटिव्ह असल्यानंतरही ‘वर्क फ्रॉम होम’ अंतर्गत कार्यालयातून फाइल व बिले बोलावून स्वाक्षरी करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. याबाबतची पूर्वकल्पना अभियंत्याने मनपा प्रशासनाला दिलेली नाही. विभागातील कर्मचाऱ्यांनीच ही माहिती सामान्य प्रशासनास दिली. परंतु, सामान्य प्रशासनाकडे तशी नोंद नाही. या प्रकारामुळे विभागात कार्यरत ३० कर्मचाऱ्यांसह बील जात असलेल्या लेखा विभागातही भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने अभियंता करोना पॉझिटिव्ह असल्यास दुजोरा दिला आहे.

मनपातील प्रभारी कार्यकारी विद्युत अभियंत्यांना अचानक ताप भरला. त्यानंतर ते करोनाबाधित असल्याची लक्षण आढळली. त्यामुळे त्यांनी घरूनच कामास सुरूवात केली. २२ नोव्हेंबरला त्यांनी ही माहिती आरोग्य विभागास दिली. सध्या ते गृहविलगीकरणात आहेत. विभागातील काहींनी त्यांना रजा घ्या, अशी विनंती केली. मात्र, त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’अंतर्गत कामास सुरूवात केली. असे करताना कार्यालयातून काही फाइल्स घरी बोलावून घेतल्या. यात एलईडी दिवे व इतर कामासंदर्भातील बिलांचा समावेश होता. विभागातील बिले एका लिपिकाने विभाग प्रमुखाच्या घरी नेऊन दिली. त्यावर स्वाक्षरी करून अभियंत्याने ती कार्यालयात पाठविली. त्यानंतर या बिलांच्या फाइल्स मनपातीलच लेखा व वित्त विभागाकडे सादर झाल्या. या प्रकारामुळे इतरांमध्येही फाइल्सच्या माध्यमातून करोना संसर्ग पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बाधित अभियंत्याने या काळात दुसऱ्या कुणालाही तात्पुरता पदभार दिला नाही. विभागातील एका अभियंत्यास काम लांबू नये म्हणून काही फाइल्स बघण्यास सांगण्यात आले. परंतु, बिलांच्या फाइल्सवर स्वाक्षरी करण्याची मनाई करण्यात आली. नियमानुसार बिलांच्या फाइल्सवर तात्पुरते काम बघण्यास सांगण्यात आलेला अधिकारी स्वाक्षरी करू शकत नाही. त्यामुळे या फाइल्स करोनाबाधित अभियंत्याच्या घरी जाऊन रितसर स्वाक्षरी होऊन परत कार्यालयात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *