- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : गरजेपेक्षा अधिक पेट्रोल व डिझेल खरेदी करू नका – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

पॅनिक न होण्याचेही नागरिकांना आवाहन, जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा 

नागपूर समाचार : अधिक सुरक्षितता आणि अनावश्यक काळजी या दोन गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून ग्राहक भीतीपोटी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत आहेत. एरव्ही ज्यांना जेवढी गरज आहे तेवढेच इंधन घेण्याचा ग्राहकाचा कल होता. तो गेल्या दोन ते तीन दिवसात विस्कळीत झाला आहे. पुरवठ्याचे गणित आणि त्याची असलेली पुरवठ्याची श्रृंखला विस्कळीत झाल्यामुळे पेट्रोलपंपांवर पेट्रोल संपल्याचे फलक लागत असल्याचे चित्र आहे. जनतेने अधिक पॅनिक न होता अथवा गरजेपेक्षा अधिक पेट्रोल व डिझेलची खरेदी न केल्यास पुरवठ्याची ही साखळी पूर्ववत येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पेट्रोल व डिझलेचा पुरवठा व त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावर नेमण्यात आलेल्या समितीच्या वरिष्ठ पातळीवरील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार दूरदृश्यप्रणालीद्वारे तर निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे, अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद काळे यांच्यासह इंधन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पुरेसा साठा उपलब्ध

सद्यस्थितीत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात १ कोटी पाच लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. सुमारे ३५ लाख लिटर पेट्रोल उपलब्ध आहे. हे प्रमाण नागपूर जिल्ह्याच्या नित्य गरजेपेक्षा अधिक आहे. साधारणतः जिल्ह्यात वाहनधारक दोन चाकी वाहनात दररोज लोक ५० ते १०० रुपयांपर्यंत पेट्रोल भरत होते. ते आता ५०० ते ८०० रुपयांचे पेट्रोल भरत आहेत. चारचाकी वाहनांच्या बाबतीतही एरव्हीची खरेदी ३०० ते ६०० रुपये प्रति ग्राहक होती. ती आता २ ते ६ हजारांपर्यंत वाढली ही वस्तुस्थिती पेट्रोलपंप असोसिएशनने सादर केली. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची गरज पूर्ण होईल एवढा साठा व पेट्रोल व डिझलेची उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांनीही आपल्या रोजच्या गरजेपुरतेच पेट्रोल अथवा डिझेलची खरेदी करावी, असे आवाहनही पेट्रोलपंप डिलर्स असोसिएशनने केले.   

वाहनाव्यतिरिक्त अन्य साधनांमध्ये पेट्रोल मिळणार नाही

ग्रामीण भागातील काही पेट्रोलपंपांवर वाहनधारकांकडून वाहनांव्यतिरिक्त डब्बा, बॅाटल अशा साधनांमध्ये इंधनाची मागणी करण्यात येत आहे. कुठल्याही पेट्रोलपंपधारकांनी वाहनाव्यतिरिक्त पेट्रोल देऊ नये. नियमानुसारही ते देता येत नसल्याचे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट सांगितले. 

चुकीचे संदेश पसरविणा-यांविरुद्ध कठोर कारवाई

समाजमाध्यमातून पेट्रोल व डिझेलच्या संदर्भात चुकीचे संदेश व अफवा पसरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अफवा पसरविणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. गरजेनुरूप पेट्रोलपंपांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

कंपन्यांनी इंधनाचा अधिकाधिक पुरवठा करावा

डिलर्स असोसिएशनने यावेळी कंपन्यांकडून मागणीप्रमाणे अधिकाधिक पुरवठा करावा, अशी मागणी केली. पेट्रोलपंपधारकांच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यानुषंगाने पेट्रोल पुरवठा करणा-या कंपन्यांनीही अधिकचा पुरवठा करावा, त्या अनुषंगाने नियोजन करावे असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.