- Breaking News

हिंगणघाट समाचार : सिंदी (रेल्वे) साठी ऐतिहासिक ‘आरोग्य’ निर्णय; ग्रामीण रुग्णालय निर्मितीचा तिढा सुटला

आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात सिंदीच्या शिष्टमंडळाची मुंबई मंत्रालयात धडक

ग्रामीण रुग्णालयाचे निर्मिती करीता मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता!

हिंगणघाट समाचार : सिंदी (रेल्वे) शहरातील तसेच येथील परिसरातील हजारो नागरिकांच्या ग्रामीण रुग्णालय निर्मितीचा जिव्हाळ्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने थेट मुंबई गाठून सरकारला महायुतीच्या सरकारकडे ग्रामीण रुग्णालयाचे निर्मितीकरिता साकडे घातले. 

या नागरिकांच्या लढ्यामुळे व पाठपुराव्यामुळे सिंदीच्या आरोग्य क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली असून, आता नागरिकांना उपचारासाठी वर्धा किंवा नागपूरच्या कराव्या लागणाऱ्या वाऱ्या टळणार असून गरजू व गरीब रुग्णांना ग्रामीण रुग्णालयाचे निर्मिती नंतर सिंदि येथेच योग्य औषधोपचार मिळणार आहेत.

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी, सिंदी(रेल्वे)च्या नगराध्यक्षा राणी स्नेहल कलोडे, नगर परिषद उपाध्यक्ष अखिल शेख, स्नेहल कलोडे तसेच भाजपाचे नगरसेवक यांनी थेट मुंबई येथे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. 

यावेळी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी सिंदी (रेल्वे)ची भौगोलिक परिस्थिती तसेच येथील शहरी व परिसरातील रुग्णांची आरोग्य सुविधे अभावी होणारी जनतेची ओढाताण आक्रमकपणे शासनदरबारी मांडली. ग्रामीण रुग्णालय हा सिंदीकरांचा हक्क व आवश्यकता असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समोर मांडली, आ.समिर कुणावार यांचे मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण रुग्णालयाची फाईल आता वेगाने पुढे कृतीत येणार असून ग्रामीण रुग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अद्यावत सुविधांसह रुग्णालय उभारणीला प्राधान्य 

रुग्णालयासोबतच शहराचे इतरही प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आमदार समीर कुणावार यांच्या मध्यस्थीमुळे मंत्रालयात संबंधित ग्रामीण रुग्णालयाचे निर्मितीकरिता हालचालींना वेग आला असून नगराध्यक्षा राणी कलोडे आणि भाजपच्या नगरसेवकांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

चौकट

सिंदीच्या जनतेने जो विश्वास टाकला, तो सार्थ ठरवण्याची ही वेळ आहे. ग्रामीण रुग्णालय हा आमचा संकल्प आहे आणि तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा विजय सिंदीतील प्रत्येक नागरिकाचा आहे.

राणी स्नेहल कलोडे, नगराध्यक्षा, सिंदी (रेल्वे).

चौकट

सिंदी रेल्वेच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालय ही काळाची गरज होती. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे सिंदीकरांचा आरोग्याचा वनवास आता संपणार आहे. जनतेला दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. सिंदीच्या आरोग्य क्रांतीसाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी मी सदैव कटिबद्ध आहे.

समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधी. रेल्वे विधान सभा क्षेत्र