- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : अभिजित गोविंदराव वंजारीचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा संघभूमीवर विजय : डॉ नितीन राऊत यांची प्रतिक्रिया

नागपूर/मुंबई : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते अभिजित गोविंदराव वंजारी यांचा विजय म्हणजे “दीक्षाभूमीचा संघभूमीवर विजय” आहे अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

55 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळालेल्या विजयाबद्दल नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला या विजयाचा विशेष आनंद होत आहे. या विजयासाठी हातभार लावणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून डॉ नितीन राऊत यांनी आभार मानलेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच दलित बहुजन समाजातील मतदान व पुरोगामी विचारांच्या सर्वांचे या विजयात मोलाचे योगदान असल्याचे डॉ राऊत म्हणाले. 

ज्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही सदैव ऋणी राहू आणि त्यांच्या हितासाठी काम करू हा शब्द या निमित्ताने डॉ राऊत यांनी मतदारांना दिला. 

आदरणीय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे या विजयासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि मदत लाभली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कॉग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचा अध्यक्ष म्हणून मला या निवडणुकीत वंजारी यांच्या विजयात आपले योगदान देण्याची संधी दिल्याबद्दलही मी महाविकास आघाडीचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केली. 

ज्या मतदारसंघात आज देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधराव फडणवीस , विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे निवडून गेले. ज्या नागपूर विभागात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राहतात, ज्या नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, त्या मतदारसंघात भाजपचा पराभव म्हणजे भाजप सरकार आणि मोदी सरकार यांच्या जनहितविरोधी धोरणांविरुद्ध शिक्षित मतदारांनी नापसंती व्यक्त केली हे यातून स्पष्ट होत असल्याचे मत डॉ राऊत यांनी व्यक्त केले. 

नागपूर विभागातील बहुसंख्य पदवीधर मतदार हे शेतकरी कुटुंबातील आहेत. मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यामुळे देशभरातील शेतकरी संतप्त असून त्याची पदवीधर मतदारांना आपल्या मतदानातून मोदी सरकारला धडा शिकविला आहे असा टोला डॉ राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 

राज्यात सत्तेत आलेले सरकार कोसळणार अशी दिवास्वप्ने पाहणाऱ्या भाजपला राज्यातील शिक्षित मतदारांनी सणसणीत चपराक लगावली आहे. त्यामुळे आता तरी भाजपचे लोक कुंभकर्णी झोपेतून जागे होतील का, असा उपरोधिक प्रश्न भाजप नेत्यांना विचारावासा वाटतो.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आणि भाजपला नाकारले. यावरून राज्यातील जनतेने या आघाडीला आपली पसंती दर्शविली हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने आपल्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे आणि विधायक विरोधकाची जबाबदारी पार पाडावी असा संदेश जनतेने दिला आहे. भाजपने तो ऐकावा एवढेच यानिमित्ताने नम्र आवाहन डॉ राऊत यांनी भाजपला केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *