- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११३ वा दीक्षांत समारंभ संपन्न

स्वतःतील क्षमता ओळखत घ्या भरारी-अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

नागपूर समाचार : स्वतःतील क्षमतेवर विश्वास ठेवत कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याचे आवाहन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११३ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी ऑडिटोरियम हॉल, नॅशनल फायर सर्विस कॉलेज राजनगर, नागपूर येथे पार पडला. यावेळी दीक्षांत भाषण करताना डॉ. अनंत पंढरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.

दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य तसेच सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. प्रत्येक माणसाची कष्ट करण्याची उर्मी अभ्यास करून पुढे जाण्याची अफलातून ऊर्जा आपण सर्वांमध्ये दिसून येत असल्याचे डॉ. पंढरे पुढे बोलताना म्हणाले. अखंड भारताचे मध्यस्थान असलेल्या नागपूर शहरात मोठे नावाजलेले तसेच विस्ताराने मोठ्या असलेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उपस्थित राहता आले याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले.

विद्यार्थ्यांमुळे शिक्षण संस्था, विद्यापीठाचा नावलौकिक वाढतो. या विद्यापीठाने देशाला राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, न्यायाधीश असंख्य मंत्री, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील नामवंत विद्यार्थी दिले, यावरून विद्यापीठ किती नावलौकिक प्राप्त आहे हे लक्षात येते. स्थापनेपासून असलेला भौगोलिक विस्तार या विद्यापीठातून नवीन पाच विद्यापीठ निर्माण झाल्याने कमी झाला असला तरी ज्ञानसंपन्न विद्यार्थी घडविण्यात विद्यापीठ मोठेच असल्याचे डॉ. पंढरे म्हणाले. विद्यार्थी पदक प्राप्त करतो, त्यावेळी त्याचे परिश्रम, कुटुंबाच्या अपेक्षा आणि ऊर्जा घेऊन दीक्षांत समारंभात येत असतो. हीच ऊर्जा आयुष्यात पूर्ण क्षमतेने पुढे जाण्याकरिता विश्वासाने खर्ची घाला, असे डॉ. पंढरे म्हणाले. गत ३५ वर्षात ‘एक आयुष्य एक ध्येय’ या उद्देशाने कार्य करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखावी तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखत त्यांना भय आणि मोह सापळ्यातून बाहेर काढावे, असे आवाहन केले. विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना १९४३ मध्ये डि.लीट. दिली आहे, त्याच यादीमध्ये आज पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची नावे येतील. अशा नावलौकिक प्राप्त विद्यापीठाचा आपण विद्यार्थी आहोत, याचा अभिमान बाळगण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

दीक्षांत समारंभात अर्थशास्त्र विषयात ९५ वर्षाचे असलेले डॉ. विनायक किसनराव पांडे यांच्यावतीने मकरंद विनायक पांडे यांनी डि.लीट. पदवी स्वीकारली. डॉ. दीपक महादेवराव वानखेडे यांना भूगोल या विषयात (मानव विज्ञान पंडित) डि.लीट. ही पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाची वयाच्या ६५ व्या वर्षानंतर आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल घनश्याम विठोबाजी मांगे यांना योगतज्ञ डॉ. विठ्ठलराव जिभकाटे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर व डॉ. वर्षा देशपांडे यांनी केले.

जीवनात ज्ञान संपन्न व्हावे – कुलगुरू डॉ. क्षीरसागर

विद्यार्थ्यांनी जीवनात अधिकाधिक ज्ञानसंपन्न आणि यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन स्वागतपर तसेच प्रास्ताविक भाषण करताना मा. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले. पालक आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंबा आणि परिश्रमामुळेच विद्यार्थ्यांना यश प्राप्त करता आले. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता न ठेवता समाजहित, पर्यावरण संरक्षण, समता आणि बंधुता यासाठी करावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, श्रमप्रतिष्ठा, नैतिक आचरण आणि समाजसेवा हे जीवनाचे मार्गदर्शक तत्व असावेत, असे कुलगुरू म्हणाल्या.

पदके / पुरस्कार वितरण

दीक्षांत समारंभात हिवाळी २०२४ आणि उन्हाळी २०२५ परीक्षेत स्पृहणीय यश संपादन केल्याबाबत १४० प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १९४ सुवर्ण, ८ रजत व २७ रोख पारितोषिक असे एकूण २२९ पुरस्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी क्रतिका शंकर धोटे हिचा बी.ए. एलएलबी (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ५ सूवर्ण पदके व २ पारितोषिक प्राप्त केल्याने, धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थान नागपूर येथील सुचेतन प्रकाश गमने यांचा एम.बी.ए. परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ६ सूवर्ण पदके प्राप्त केल्याने, विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग (स्वायत्त) नागपूर येथील अर्चना किसन लाळे यांचा एम.ए. (बुद्धिस्ट स्टडीज) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ६ सूवर्ण पदके प्राप्त केल्याने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील तथागत ठाकूर यांनी एल.एल.बी. (तीन वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित गुण सरासरी प्राप्त करून ५ सुवर्णपदके प्राप्त केल्याने, यशवंत महाविद्यालय वर्धा येथील विद्यार्थिनी निवेदिता राजेंद्र फुसाटे यांचा एम.ए. (मराठी) परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक तर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थिनी प्राची वामनराव ठाकरे यांनी बॅचलर ऑफ जर्नालिझम परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून ३ सुवर्णपदके व २ पारितोषिक प्राप्त केल्याने सत्कार करण्यात आला. यांच्यासह पदक पारितोषिक प्राप्त विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतील ६१, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेतील ९, मानव विज्ञान विद्या शाखेतील ४६ तर आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्या शाखेतील २४ विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले ‌

आचार्य पदवीधारक

या दीक्षांत समारंभात विद्याशाखा निहाय २७९ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत १२१, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत ५८, मानवविज्ञान विद्याशाखेत ८१, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत १९ आदींचा समावेश आहे.

६१,८७१ पदवी / पदविका प्रदान

या दीक्षांत समारंभामध्ये एकूण ६१,८७१ विद्यार्थ्यांना पदवी / पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये स्नातक पदवीधर ४९,२३० विद्यार्थी तर स्नातकोत्तर पदवीधर १२,०८७, डि.लीट २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांतील पात्र पदवीकांक्षींची ( डिग्री सर्टिफिकेट) विद्याशाखा निहाय संख्या : विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – २०,३०८, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – १४,६२५, मानव विज्ञान विद्याशाखा -१२,४४१, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा -५,७०९, स्वायत्त महाविद्यालये – ८,५१४, पदविका प्रमाणपत्र – २७३, एम.आर्च. बाय रिसर्च १ यांना पुरस्कृत करण्यात आले.