पुणे समाचार : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित ‘विजय संकल्प सभे’मध्ये उपस्थित पुणेकरांना संबोधित केले.
पुणे देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे. पुणे हे तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र आणि जीसीसी चे हब बनत चालले आहे. यादृष्टीने पुण्याला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी शहरात 110 किमी मेट्रोचे नेटवर्क तयार करत आहोत, जेणेकरून दळणवळण सुखकर होईल. सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी पुण्यात जवळपास 12 सीवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू केले आहेत. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुळा–मुठा नदीचा किनारा विकसित करत आहोत. यामुळे नदीच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच, पुण्याच्या सर्व भागांमध्ये समान पाणीपुरवठा केला जाणार आहे आणि पाण्याची होणारी गळती कमी करण्याचाही प्रयत्न करणार आहोत.

पुण्याला व्हायब्रंट शहर बनवण्यासाठी आम्ही ‘डेफिनेट व्हिजन’ तयार केले आहे. पायाभूत सुविधांसाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार केला आहे. यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक करणार आहोत. विकसित पुण्यासाठी ‘पुणे ग्रोथ हब’ तयार करत आहोत. तसेच पुण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुण्यात जवळपास 54 किमीचे भूयारी मार्ग तयार करणार आहोत.
पुणे शहरासाठी इनर आणि आऊटर रिंग रोडचे काम हाती घेतले आहे, ज्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल. पुणे–अहिल्यानगर, पुणे–सोलापूर, पुणे–नाशिक या सर्व रस्त्यांवर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आणि मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्या माध्यमातून डबल डेकर पूल तयार करणार आहोत. ‘इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’च्या माध्यमातून थ्री-डी ट्विनिंगचे पहिले मॉडेल पुण्यात तयार करत आहोत, जेणेकरून कोणालाही कोणत्याही भागात नव्याने अतिक्रमण करता येणार नाही. शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क तयार करत आहोत, जेणेकरून पुण्याच्या सुरक्षेत भर पडेल आणि वाहतुकीचे व्यवस्थापनही करता येईल. तसेच आरोग्य, पूर नियंत्रण, कचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
येत्या काळात आम्ही पुण्याचा चेहरा बदलून दाखवू. 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास पुणेकरांना दिला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री पंकजाताई मुंडे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.




