नागपुर समाचार : नागपूर महानगरपालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नागपूर शहरात झालेल्या ऐतिहासिक विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी भारतीय जनता पक्ष नागपूरतर्फे आज ‘व्हिडिओ व्हॅन’ प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नागपूर भाजप कार्यालयातून १२ व्हिडिओ व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.
या व्हिडिओ व्हॅनच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपच्या महापौरांच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या विकासकामांची माहिती सामान्य नागरिकांना दिली जाणार आहे. नागपूरचा जो कायापालट झाला आहे, तो भाजपच्या काळातच झाला असून शहराचा चेहरामोहरा कसा बदलला आहे,याचे प्रभावी चित्रण या व्हॅनवरील स्क्रीन वर पाहायला मिळेल.
संपूर्ण महानगरात नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ याप्रमाणे एकूण १२ व्हॅनचे नियोजन करण्यात आले आहे.शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा आणि गजबजलेल्या ठिकाणी या व्हॅन थांबून भाजपच्या कामगिरीचा प्रचार करतील व भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आवाहन करतील.या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती असल्याने,ज्या प्रभागात शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तिथेही युतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन या व्हॅनद्वारे केले जाणार आहे.
या शुभारंभ वेळी निवडणूक प्रमुख प्रा.संजय भेंडे, माजी आमदार प्रा.अनिल सोले, व्हिडिओ व्हॅन प्रचाराचे प्रमुख छोटू बोरीकर,भाजप कार्यालय मंत्री ब्रिज भूषण शुक्ला यांच्या सह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.




