नागपूर समाचार : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनजाती चेतना परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘जनजातीय गौरव दिवस’ महाजनजाती चेतना परिषदाचा भव्य सोहळा आज मानकापुर स्टेडियम, ओल्ड शिव मंदिर रोड, नागपूर येथे उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. आदिवासी समाजाच्या जल-जंगल-जमिनीवरील हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा देणारे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या अशा नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक महत्त्वाचे ठरले.

कार्यक्रमात आदिवासी संस्कृती, परंपरा आणि कलागुणांचे वैभवशाली दर्शन घडविण्यासाठी विविध आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणे मंचावर सादर करण्यात आली.
आदर्श सांस्कृतिक महोत्सव’, ‘आदिवासी कलागुणांचे प्रदर्शन’, ‘आदिवासी योजनांची माहिती’, ‘आदीकर्मयोगी पीएम जनमन’, ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष’ अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले.
स्थानिक तरुण-तरुणींनी सादर केलेल्या कलात्मक कार्यक्रमांमधून बिरसा मुंडा यांच्या शौर्यपरंपरेचा, आदिवासी संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा प्रभावी संदेश सर्वांपर्यंत पोहोचला.
हा भव्य सोहळा जनजाती समाजाच्या सामूहिक एकात्मतेचे, सांस्कृतिक संपन्नतेचे आणि प्रेरणादायी ऐतिहासिक वारशाचे जिवंत प्रतीक ठरला.




