नागपूर समाचार : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची 2025–2029 या कालावधीसाठीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून, विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ना. अजित पवार यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. विविध क्रीडा क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना संघटनेत महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.
वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून ना. मुरलीधर मोहोळ (कुस्ती) यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर बास्केटबॉलचे प्रतिनिधित्व करणारे आमदार संदीप जोशी हे संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.
गेल्या अनेक वर्षात राज्य ऑलिम्पिक संघटनेत विदर्भाला प्रतिनिधित्व नव्हते. आ. संदीप जोशी यांच्या नियुक्तीने आता विदर्भातही प्रतिनिधित्व मिळाले आहे. या संघटनेचे मुख्य आश्रयदाते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.
महाराष्ट्रातील क्रीडाक्षेत्राला नवे बळ आणि दिशा देण्यासाठी ही कार्यकारिणी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विविध खेळातील पदाधिकारी आणि सदस्यांच्या माध्यमातून राज्यातील ऑलिम्पिक चळवळीला अधिक वेग देण्याचे उद्दिष्ट संघटनेने स्पष्ट केले आहे. या निवडीमुळे राज्याच्या क्रीडा विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची संधी मिळाली असून या संधीचे आपण सोने करू, अशी प्रतिक्रिया आ. संदीप जोशी यांनी दिली.




