- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : शिव महिम्‍न स्‍तोत्र पठणाने वातावरण भारावले; खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ ला उत्‍स्फूर्त प्रतिसाद 

नागपुर समाचार : भगवान शिवाच्या महिमेचे, वैभवाचे, ज्ञानाचे आणि भक्तीचे अद्भुत काव्यमय रूप असलेल्‍या शिव महिम्‍न स्‍तोत्र पठणाने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणातील वातावरण भारावून गेले.  

खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ कार्यक्रमात सोमवारी सकाळच्‍या सत्रात शिव महिम्‍न स्‍तोत्र पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कण्‍वाश्रमाच्‍या भगिनींच्‍या सुरात सूर म‍िसळत शेकडोच्‍या संख्येने उपस्थित महिला, पुरुषांनी एकसुरात स्‍तोत्र पठण केले. शेवटी शिवशंकराची आरती करण्‍यात आली. 

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्‍या व संस्‍कार भारतीच्‍या अध्‍यक्ष कांचनताई गडकरी, प्रजापिता ब्रम्‍हकुमारीच्‍या रजनी दीदी, रामनगर शक्तिपीठच्‍या स्‍मीता केळकर, माई खांडेकर, देवी अ‍हल्‍या मंदिरच्‍या शिल्‍पाताई जोग, खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, डॉ. दीपक खिरवडकर यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्‍यात आला. 

आज सामूहिकरित्‍या एकसुरात शिव महिमा ऐकून परमपिता परमात्‍मा शिवजी साक्षात प्रकट झाल्‍याचा भास झाला. दिव्‍य ज्‍योती स्‍वरूप परमात्‍माच्‍या या स्‍तोत्रांमुळे अद्भूत शक्‍ती प्राप्‍त झाली असल्‍याची प्रतिक्रिया रजनी दीदी यांनी व्‍यक्‍त केली व त्‍यांनी या दिव्‍य अनुभूतीसाठी श्री. नितीन गडकरी व सौ. कांचनताई गडकरी यांचे आभार मानले. 

शिव महिम्‍न स्‍तोत्र हे संस्‍कृत भाषेतील शंकराचे मुख्‍य स्‍तोत्र असून पुष्‍पदंत गंधर्वाने ते लिहिले आहे. यात एकुण 43 श्‍लोक असून त्‍यातील 31 श्‍लोक हे शिवस्‍तुतीने युक्‍त आहेत. या श्‍लोकांमुळे वाणीवर संस्‍कार होतात, जीभेला वळण लागतो, शब्‍दांचे अभ्‍यास व आंतरिक शांती मिळते, अशी माहिती रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन करताना दिली. दर्शना नखाते, सुजाता खंबाटा, सुजाता काथोटे, श्रीरंग वऱ्हाडपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.