- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज; भाजपकडून नोंदणी मोहिमेला गती देण्याची तयारी

नागपूर समाचार : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, भाजपने आता विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाने या निवडणुकीसाठी सात लाख मतदारांची नोंदणी करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असून, ही जबाबदारी आता सर्व पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

मात्र, काही कार्यकर्ते ही मोहीम अद्याप गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः अर्ज भरून या मोहिमेला बळ दिले आहे. त्यांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आता पक्षाच्या संघटनात्मक स्तरावर ही मोहीम अधिक वेगाने राबविण्याचे नियोजन केले जात आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दिवाळीनंतर केवळ मतदार नोंदणीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करून या वेळी कोणतीही ढिलाई न ठेवता तयारी करण्याचे ठरविण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुधाकर कोहळे यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून आणि सुधीर दिवे यांची सहप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. कोहळे यांनी सांगितले की, “या वेळी सात लाख पदवीधरांची नोंदणी पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीपूर्वक काम करणे आवश्यक आहे.”

पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारांसाठी स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत की, जास्तीत जास्त मतदार अर्ज गोळा करणे अनिवार्य आहे. मात्र, काहींनी याकडे दुर्लक्ष केल्याने उच्चस्तरीय बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

अलीकडेच नागपुरात झालेल्या विदर्भस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पदवीधर नोंदणीवर विशेष भर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शहरात आल्यावर त्यांनी स्वतः अर्ज भरून मोहिमेला औपचारिक सुरूवात केली.

या कार्यक्रमाला सुधाकर कोहळे, सुधीर दिवे, दयाशंकर तिवारी, गिरीश देशमुख, श्रीकांत आगलावे, नरेंद्र बोरकर, विष्णू चांगदे आणि रितेश गावंडे हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, “पदवीधर मतदार नोंदणी ही केवळ औपचारिकता नसून, प्रत्येक कार्यकर्त्याने ती एक जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे. विशेषतः तरुण मतदारांपर्यंत पोहोचणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे.या हालचालींमुळे भाजपने आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आपले संघटन पुन्हा सज्ज करण्याचे संकेत स्पष्ट दिले आहेत.