जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण संजीवनी योजनेंतर्गत दोन टप्प्यात एकूण 755 ई-रिक्षांचे दिव्यांग व्यक्तींना वाटप
नागपूर समाचार : सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक व्यापक विचार आम्ही बाळगला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकातील माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जी दूरदृष्टी बाळगली ती प्रत्यक्षात आम्ही समाजातील विविध घटकांना प्रत्ययास देत आहोत. त्यांना अभिप्रत असलेल्या सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून सामाजिक न्याय विभागाचा हा विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ पोहचविण्याचा उपक्रम याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्व. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या समारंभात ते बोलत होते. प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने ई-रिक्षा व इतर वैयक्तिक लाभ योजना वाटप समारंभास राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, सर्वश्री आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके, डॉ. आशिष देशमुख, मोहन मते, चरणसिंग ठाकुर, संजय मेश्राम, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वंचित घटकांना स्वंयरोजगाराची साधने मिळण्यासाठी आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्नरत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली आहे. राज्यात आपण 25 लाख दीदींना लखपती केले आहे. आजच्या घडीला राज्यात सुमारे 50 लाख दीदी आता लखपती दीदी झाल्या आहेत. लवकरच 1 कोटी दीदींना लखपती करण्याचा संकल्प आपण पूर्ण करू असा, विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील मांग-गारुडी व इतर वंचित घटकातील व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन शासनाचे विशेष कॅम्प लावले. यातून या समाजाला त्यांच्या हक्काचे ओळखपत्र मिळाले. यामुळे रमाई आवास सारख्या योजना प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पाहचविणे आता सहज शक्य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव केला.
जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी व्यक्तीला ऊर्जा दाता करण्याची नाविन्यपूर्ण योजना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मांडली. यानुसार नाविन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक आदिवासी घरावर सौरऊर्जा देण्याचे नियोजन झाले. या योजनेतील उपयोगीता लक्षात घेवून लवकरच अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग घटकातील उपेक्षित लोकांनाही या योजनेचा लाभ पोहचू असे, सुतोवाच त्यांनी केले.