नागपूर समाचार : श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, नागपूर तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’चा दिवाळी मिलन सोहळा लक्ष्मीनगर येथील जेरील लॉन येथे आज (ता. 16) उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
मंचावर विशेष अतिथी म्हणून श्रीमती देवयानी संदीप जोशी यांच्यासह कार्यक्रमाचे संचालक आनंद टोळ, ज्योत्स्ना कुऱ्हेकर, प्रकाश रथकंठीवार, प्रणय मोहिते आणि प्रणव घुगरे उपस्थित होते.
श्रीमती देवयानी जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, ज्यांच्या आयुष्यातील आधार तुटला, त्यांना नव्याने जगण्याची प्रेरणा देणारा ‘सोबत पालकत्व प्रकल्प’ हा खऱ्या अर्थाने मानवतेचा उत्सव असल्याचे त्या म्हणाल्या
या प्रसंगी प्रकल्पाशी जोडलेल्या पालकांना आणि त्यांच्या परिवारांना दिवाळीनिमित्त आमदार संदीप जोशी यांच्यातर्फे भाऊबीज ओवाळणी म्हणून महिनाभराचे राशन किट भेट स्वरूपात देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन ज्योत्स्ना कुऱ्हेकर यांनी केले. या भावनिक मिलन सोहळ्याने स्वयंसिद्ध मातांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वासाचा दिवा पुन्हा उजळला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली. मुख्य कार्यक्रमानंतर आयोजित संगीत रजनीने कार्यक्रमात अधिक रंगत आणली. कार्यक्रमाला सोबत प्रकल्पातील पालक, विद्यार्थी व नागरिक, हितचिंतक उपस्थित होते.
सोबत पालकत्व प्रकल्प : एक संवेदनशील प्रवास
कोरोना काळात पितृछत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना व एकल पालकत्वाची जबाबदारी आलेल्या मातांना आधार देण्यासाठी ‘सोबत पालकत्व’ प्रकल्प उभा राहिला.
गेल्या चार–पाच वर्षांपासून सातत्याने चालणारा हा उपक्रम शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, समुपदेशन, पोषण या पाच तत्वांवर कार्यरत आहे. दरवर्षी या परिवारांसाठी ‘राखी’ आणि ‘दिवाळी’ हे दोन स्नेहसोहळे साजरे केले जातात. या मातांसाठी ‘सोबत पालकत्व प्रकल्प’ म्हणजे त्यांचं माहेरघर, तर प्रकल्पाचे प्रणेते मा. आमदार संदीप दिवाकरराव जोशी हे त्या मायेच्या घराचे आधारस्तंभ आहेत.




