नागपूर समाचार : दिनांक ११ ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री धन्यधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियान शुभारंभ कार्यक्रम राष्ट्रीय विज्ञान संकुल पुसा, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका मुख्यालय, ग्रामपंचायत, कृषी विज्ञान केंद्र, बाजार समिती, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र अशा विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वेबकास्ट प्रणाली द्वारे देशातील व राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
या अभियान शुभारंभ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासन कृषि विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. आशिष जयस्वाल यांचे अध्यक्षतेखाली केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था, पांजरी, नागपूर या ठिकाणी संपन्न झाला. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सीआयसीआरचे प्रभारी संचालक डॉ ब्लेझ डिसोजा, कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ अरविंद वाघमारे, नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. माधवरेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे आणि आत्मा यंत्रणेच्या प्रकल्प संचालक आत्मा डॉ अर्चना कडू यांनी संयुक्तरित्या केले. या कार्यक्रमात सीआयसीआर आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. उल्हास गळकाटे, डॉ विनिता वाघमारे, डॉ. रामकृष्ण, डॉ मणीकंदन, डॉ. सुनीता चव्हाण, डॉ. सचिन वानखेडे, डॉ. मयूर मेश्राम, डॉ. बाबासाहेब फड, कृषी उपसंचालक दत्तात्रय येळे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले इ. उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कृषि व संलग्न विभागातील अधिकारी/कर्मचारी, कृषि विद्यापीठे /कृषि विज्ञान केद्रांचे शास्त्रज्ञ, कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेती शेतकरी, नैसर्गिक शेती करीत असलेले शेतकरी, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला.

शेती क्षेत्रासमोर वातावरण बदल, कमी उत्पादकता, कमी सिंचन क्षमता, कृषी कर्जाची अपुरी उपलब्धता, साठवणूक सुविधांची कमतरता, काढणी पश्चात पायाभूत सुविधा, प्रक्रिया, मूल्यवर्धन, विपणन यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. या अडचणींना सामोरे जाऊन शाश्वत शेती पद्धतीचा विकास करणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, पिकांच्या उत्पादनात वाढ करणे, मिश्र पीक पद्धती, पाण्याचा किफायतशीर वापर , उत्पादित मालाची साठवणूक, विपणन, प्रक्रिया, मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवणे या दृष्टिकोनातून देशातील 100 कृषी आकांक्षीत जिल्हे यांची या धन धान्य योजनेत निवड करण्यात आलेली आहे. ही निवड करताना कमी उत्पादकता, अपुरा सिंचन पुरवठा, कर्जाची मर्यादित उपलब्धता, निव्वळ पिका खालील क्षेत्र, शेती खातेदारांची संख्या अशा विविध बाबी विचारात घेतल्या आहेत.
देशात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना अंतर्गत 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्र राज्यातील पालघर ,रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. कृषी व ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून शासनाच्या विविध विभागांमार्फत स्वतंत्ररीत्या अनेक योजना राबवल्या जातात. मात्र त्याचा एकत्रित परिणाम दिसून येण्यासाठी अशा विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून या निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने त्या योजना राबवण्यात येणार आहेत. यासाठी सदर जिल्ह्याचे पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा विकास आराखडा बनवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यात कृषी विकासाशी निगडित खात्याचे अधिकारी व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधक, बँका यांचा समावेश राहणार आहे. यांच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्याचा विकासाचा पाच वर्ष आराखडा तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेचे सनियंत्रण. मूल्यमापन राष्ट्रीय स्तरावरून नीती आयोगाच्या माध्यमातून केले जाणार आहे. कृषी पिकांची उत्पादकता वाढवणे आवश्यक असताना जमीन, पाणी सारख्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होऊ नये. पर्यावरण समतोल राहावा. या दृष्टिकोनातून उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. याचबरोबर कडधान्याच्या बाबतीत परदेशातून होणाऱ्या आयातीवर अवलंबून न राहता स्वयंपूर्णता मिळवण्याचे उद्दिष्ट या योजने पाठीमागे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान तसेच राष्ट्रीय कडधान्य अभियान देखील राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या एकत्रित उपाय योजनांच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व राष्ट्रीय कडधान्य अभियान याची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे.




