- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी ‘एनडीसीडीए’ची मागणी

नागपूर समाचार : ऑनलाइन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होत असून अनधिकृत औषध पुरवठ्याला चालना मिळते आहे. यामुळे बंद असलेल्या गोळ्याही विकण्याचा धोका बळावला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर ऑनलाइन औषध विक्रीवर बंदी घालावी, या मागणीसाठी उद्या गुरूवार, २५ सप्टेंबर ‘जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त अधिकृत औषध विक्रेत्यांकडून शहरातील निवडक ३० चौकांमध्ये मूकप्रदर्शन केले जाणार आहेत अशी माहिती नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव उखरे यांनी पत्रपरिषदेत दिली.

या मूक प्रदर्शनाबद्दल माहिती देतांना उखरे म्हणाले की, औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व परवाना असलेल्या फार्मासिस्टच्या देखरेखी खालीच रुग्णांपर्यंत पोहोचली पाहिजेत. मात्र, ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर विक्रीमुळे औषधांचा गैरवापर वाढण्याची शक्यता आहे. नकली व कालबाह्य औषध विक्रीतून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. कोणताही अधिकृत विक्रेता हा डॉक्टरांच्या सल्याशिवाय झोपेच्या किंवा डिप्रेशनच्या गोळ्या देत नाही. परंतु ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून हा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचेही उखरे म्हणाले. 

फार्मासिस्ट हे रुग्णांना योग्य औषध वापराबाबत मार्गदर्शन करतात. ऑनलाइन विक्रीत हा मानवी घटक पूर्णपणे लुप्त होतो, असेही संघटनेने स्पष्ट केले. याचाच निषेध नोंदविण्यासाठी ‘एनडीसीडीए’च्या वतीने दिवसभर मूक आंदोलन करण्यात येईल. यावेळी नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन सुरक्षित औषध पुरवठ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.  

प्रलोभन दोखविणे चुकीचेच

ड्रग्स अॅण्ड कॉस्मॅटिक अॅक्ट १९४० नूसार कोणत्याही औषध विक्रेत्याला औषधांची विक्रेत्याने प्रलोभन दाखवून औषध विक्री केल्यास ते कायद्याने गुन्हा आहे. तसेच फार्मासिस्टनेही डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषधी देऊ नये हा निमयच आहे. रुग्णांनी फक्त अधिकृत परवानाधारक औषध विक्रेत्यांकडूनच औषध खरेदी करावे. सूटच्या मागे धावू नये, असा सल्ला महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे उपाध्यक्ष धनंजय जोशी यांनी दिला. 

पत्रपरिषदेमध्ये नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सहसचिव नंदकिशोर टापरे, विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष निखिल भुते, पूनित ठक्कर, शाम चरोडे, लतिफ बराडे, अनिल कुमार आप्पा हरीश गणेशानी, मिलिंद काटोले, अविनाश दाढे, अशोक ठाकरे, अमलेंदु दत्ता आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *