हलबा समाज महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन
नागपूर समाचार : कुठल्याही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा सर्वांत मोठा दुवा आहे. हलबा समाजाने आपल्या समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला, पण शिक्षणाची कास धरली त्यामुळेच समाजातील अनेक लोक मोठ्या पदांपर्यंत पोहोचले. अनेकांनी उद्योग क्षेत्रात नाव कमावले. पुढेही शिक्षणातूनच प्रगतीचा मार्ग गवसणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
हलबा समाज महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. दिनदयाल नगर येथील हलबा समाज महासंघाच्या सांस्कृतिक भवनात झालेल्या या सोहळ्याला माजी आमदार विकास कुंभारे, हलबा समाज महासंघाचे अध्यक्ष डॉ. देवराम नंदनवार, महासचिव डॉ. रमेश पराते यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. गडकरी म्हणाले, ‘हलबा समाजाचा उदरनिर्वाह पूर्वी हातमागावर होता. माझ्या धापेवाडा गावासह बेला, खापा येथे हलबा समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. पण हातमागाचा व्यवसाय संपुष्टात आला. मात्र या परिस्थितीत अनेक अडचणी असताना हलबा समाजाने शिक्षणाची कास धरली. मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचे चांगले परिणामही आज आपण बघतोय.’ समाजाला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर मुलांना चांगले शिक्षण देतानाच त्यांच्यातील उद्यमशीलता वाढवावी. त्यातूनच आर्थिक प्रगती होईल, असेही ना. गडकरी म्हणाले.




