मुख्यमंत्री १५० दिवस कार्यक्रमाचे ध्येय गाठण्याचा मनपाचा निर्धार
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला आढावा
नागपूर समाचार : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांच्या विकासाच्या अभियानाचे ध्येय गाठण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी विशेषतः ऑनलाईन कामकाजावर अधिकाधिक भर द्यावा, तसेच नागरिकांना सेवा पुरविण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (ता. १९) अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री १५० दिवसांच्या कामकाजाच्या आढावा मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., अतिरिक्त आयुक्त विजया बनकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके, , उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त गणेश राठोड, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बाराहाते, शिक्षणाधिकारी साधना सयाम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, नगरविकास विभागाचे उपसंचालक ऋतुराज जाधव, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे यांच्यासह दहाही झोनचे सहायक आयुक्त व इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
माहितीसाठी एआयचा वापर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १५० दिवसातील विकास कामाच्या अभियानाचा शुक्रवारी आढावा घेण्यात आला. यात आयुक्तांनी महानगरपालिकेचे कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने करण्यावर भर दिला. नागरिकांना माहिती देण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यासाठी विभाग प्रमुखांनी माहिती तंत्रज्ञान विभागाकडे संबंधित विषयाची माहिती अद्यावत करावी. ही माहिती नागरिकांना देण्यासाठी एआय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यामुळे नागरिकांनी ऑनलाईन माहिती घरबसल्या मिळू शकेल. यासंदर्भात मनपा प्रशासनाने प्रश्नावली तयार केली आहे. विभागप्रमुखांनी तसेच झोनच्या सहायक आयुक्तांनी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची शक्यता लक्षात घेऊन उत्तरे अपडेट करावी, असेही त्यांनी यावेळी सुचविले. ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश ही आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.
संकेतस्थळ अद्ययावत
नागपूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ अद्यावत करून तेथे नागरिकांतर्फे दाखल केल्या जात असलेल्या तक्रारींची दखल संबंधित विभाग प्रमुखांनी घेण्याचे निर्देश यावेळी दिले. आपले सरकार तसेच पीजी पोर्टलवरील तक्रारींच्या निराकरणाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, तसेच उत्तरे देताना ही उत्तरे अचूक व दर्जेदार राहतील, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असेही निर्देश यावेळी आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले.




