- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : फेज-२ मधील रीच-४ए मध्ये पहिल्या सेगमेंटच्या लाँचिंगला सुरुवात

नागपूर समाचार : नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या फ़ेज-२ अंतर्गत रीच-४ए मध्ये (प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर, एकूण लांबी ५.३१ कि.मी.) निर्माण कार्य जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आले असून या रिच मध्ये भंडारा रोडवरील कारखाने, कळमणा मार्केट, सिम्बायोसिस विद्यापीठ तसेच हिंगणा, बुटीबोरी, कन्हान आणि नागपूर शहरातील इतर भागांशी मेट्रो द्वारे कनेक्टिव्हीटी सुधारण्यात मदत होईल.

रीच-४ए मध्ये एकूण १९२ स्पॅन्सचा समावेश आहे, ज्यामध्ये २ कि.मी. लांबीचा डबल डेकर देखील आहे. या रिच मधील सिव्हिल कार्ये २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.महामेट्रोने नियुक्त केलेल्या मेसर्स कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीद्वारे रीच-४ए मध्ये सेगमेंट लाँचिंगचे कार्य सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यात प्री-कास्ट केलेल्या काँक्रीट सेगमेंट्सचे उचलून व स्थापित करून व्हायाडक्ट तयार केल्या जात आहे.

या रिच मधील पहिला स्पॅन ३१ मीटर लांब आहे, जो ग्राउंड सपोर्टेड लॉन्चिंग सिस्टीम चा वापर करून उभारण्यात आला आहे. या ३१ मीटर लांबीच्या स्पॅनमध्ये एम50 ग्रेड काँक्रीटचे १८० घनमीटर आणि एफई 550डी स्टीलचे २८.५ टन प्रमाण वापरण्यात आले आहे.

एकूण ११ स्वतंत्र सेगमेंट्स एकत्र करून हा ३१ मीटरचा स्पॅन तयार केला जातो. शेवटच्या सेगमेंटची रुंदी १.९७५ मीटर असून, उर्वरित सेगमेंट्स ३ मीटर रुंद आहेत. प्रत्येक सेगमेंटचे वजन ३४ ते ४३ टन एवढे आहे. प्रत्येक सेगमेंट कास्टिंग यार्डमधून निर्माणाधीन साइटवर ट्रेलरद्वारे नेण्यात येतो, यासाठी पेट्रोलिंग वाहन आणि ट्राफिक मार्शल्स सोबत असतात जे रस्त्यावरील वाहनचालकांचे सुरक्षिततेचे पालन सुनिश्चित करतात.

२२० टन क्षमतेच्या क्रेनच्या सहाय्याने सेगमेंट्स उचलल्या जात आहेत. हे संपूर्ण कार्य अत्यंत काटेकोर सुरक्षा नियोजन, जोखीम मूल्यांकन, तसेच प्रमाणित उपकरणे व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांद्वारे पार पाडले जात आहे. ग्राउंड सपोर्टिंग सिस्टीमचा वापर करून एक स्पॅन पूर्ण करण्यासाठी – ज्यामध्ये सेगमेंट उचलणे, ड्राय मॅचिंग, अलाईनमेंट, गोंद लावणे, पोस्ट-टेन्शनिंग आणि स्पॅन लोअरिंग यांचा समावेश आहे ज्याला एकूण ७ दिवस लागतात.

महत्वपूर्ण आहे कि, रीच-१ए, २ए, २बी आणि ३ए या मध्ये सेगमेंट इरेक्शनचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. आता रीच-४ए येथे सेगमेंट इरेक्शनची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशा प्रकारे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-२ अंतर्गत अंतिम व्हायाडक्ट स्ट्रेच म्हणून याचा समावेश झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *