महसूली विभागांचा पूर्वतयारीबाबत आढावा
मुंबई समाचार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात ‘सेवा पंधरवडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. महसूल विभागाने या अभियानाची तयारी सुरू केली असून पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे आणि स्थानिक आवश्यकतेनुसार नावीन्यपूर्ण उपक्रम असे या अभियानाचे स्वरूप असेल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्तांकडून या अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी लोकसहभाग आणि व्यापक प्रसिद्धीवर विशेष भर दिला.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले हे अभियान सर्वसमावेशक होण्यासाठी पंचायत ते पार्लमेंट मधील सर्व लोकप्रतिनिधींना यामध्ये सहभागी करून घ्यावे ग्रामसभेपर्यंत पोहोचून पंधरवड्याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती द्यावी यासाठी विविध प्रसार माध्यमांची देखील मदत घ्यावी अभियानादरम्यान केलेल्या कामांचे डॉक्युमेंटेशन करून उत्स्फूर्तपणे हे अभियान राबवावे.
जिल्हाधिकारी यांना पालकमंत्र्यांशी संपर्क साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. तहसीलदारांनी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ग्रामसभेला अभियानाची माहिती पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
१७ तारखेला पुणे येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पंधरवड्याचा शुभारंभ होणार असून सर्व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आपापल्या जिल्ह्यात याचा शुभारंभ करण्यात यावा असे निर्देश श्री बावनकुळे यांनी दिले पंधरवड्याचा समारोप पवनार येथे होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याचे श्री.बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागामध्ये सुरू असलेल्या तयारीबाबत यावेळी माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यांपर्यंत सर्व यंत्रणांची बैठक घेतली असून ग्रामसभेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, वनपट्ट्यांचे वाटप, स्थलांतरित नागरिकांचा प्रश्न सोडविणे, प्रकल्प बाधितांचे प्रश्न सोडविणे, कातकरी उत्थान, वन हक्क दावे, शालेय विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप, धरती आबा योजनेचा लाभ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ आदी स्वरूपाचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी विविध विभागीय आयुक्तांनी दिली.
जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे आणि नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी अनुक्रमे प्रत्येक सर्कलमध्ये गावांची निवड करून सातबारा अद्ययावत करण्याची मोहीम राबवली जात असल्याचे सांगितले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांची करवसुली आणि ई-रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोपी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदा आयोजित करण्यात याव्यात. सर्वसामान्यांशी निगडित विषयांचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची सूचना त्यांनी केली.