सावनेर समाचार : सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या वतीने लता मंगेशकर हॉस्पिटल (हिंगणा रोड, नागपूर) व माझी माऊली फाउंडेशन मिशन हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क आरोग्यवाहिनी (बस) सेवा आणि सवलतीच्या दरात उपचार सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमाचा शुभारंभ ४ सप्टेंबर २०२५ रोजी गांधी चौक, सावनेर येथे आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
या योजनेंतर्गत दररोज निश्चित मार्गावरून निःशुल्क आरोग्यवाहिनी बस सुरू राहील. सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील रुग्णांना नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचे वैद्यकीय उपचार केले जातील आणि त्यानंतर रुग्णांना परत त्यांच्या गावी सोडण्याची सोय असेल.
यासोबतच, शासकीय योजनांअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत सेवा देण्यात येईल, तर इतर रुग्णांना ५० टक्के सवलतीच्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.
या प्रसंगी आ. डॉ. आशिष देशमुख म्हणाले,
“मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सेवा मिळावी, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. या आरोग्यवाहिनी उपक्रमामुळे प्रत्येकाला सहज उपलब्ध व दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होईल.”
फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. आयुश्री देशमुख यांनी सांगितले की, बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी सवलतीच्या दरात उपचार सेवा पुरवली जाणार आहे. विशेषतः ‘माझी माऊली मातृत्व सहयोग योजना’ अंतर्गत महिलांची विशेष काळजी घेतली जाईल.
तसेच, लवकरच सावनेर-कळमेश्वर क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला ‘आमदार हेल्थ कार्ड’ वितरित करण्यात येणार असून त्याद्वारेउपचारांवर सवलत घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या उल्लेखनीय कार्याबद्दल सावनेर व्यापारी संघ तर्फे आ. डॉ. आशिष देशमुख यांचा सत्कार करून त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाला अरविंद लोधी, रामराव मोवाडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पीयूष बुरडे, मंदार मंगळे,इमेश्वर यावलकर, दिगंबर सूरतकर, विजय देशमुख, पावन जामदार , पंकज भोंगाडे ,डॉ. कृष्णराव भगत, तुषार उमाठे, महेश चकोले ,विलास ठाकरे, सोनू नवधिंगे,आदी मान्यवर उपस्थित होते.




