मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला आढावा
नागपूर समाचार : शहरातील दहाही झोन कार्यालयांमधील नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रानुसार नागरिकांकरिता अँटी-रेबिज लसीकरण अर्थात एआरव्ही केंद्र सुरू करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिला.
शहरातील भटके कुत्र्यांची वाढती संख्या व कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी (ता.२६) महानगरपालिका मुख्यालयातील सभाकक्षात अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्निल लोखंडे उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण आणण्यसायासाठी एक मार्गदर्शक सूची तयार करावी, तसेच एक समिती गठीत करून या समितीची नियमितपणे बैठक घ्यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले. सध्या महानगरपालिकेकडे यासंदर्भात असलेल्या व्यवस्थेच्या क्षमतांमध्ये वाढ करावी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कुत्रे पकडणार्यांचे पथक (डॉग कॅचर्स) तयार करावे, सध्या महानगरपालिकेच्या सध्याचे मनुष्यबळांना अधिक प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
कुत्रे पाळणाऱ्यावर त्यासाठी परवाना घेण्याची सक्ती करावी, हा परवाना घेण्याची प्रक्रिया महापालिकेने ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे. भटके कुत्र्यांच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. कुत्र्यांना अन्न टाकण्यासाठी विशिष्ट जागा निश्चित कराव्या, असेही आयुक्त डॉ. चौधरी यांनी सुचविले. ज्या ठिकाणी अधिक कचरा जमा होतो, त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक राहत असल्याने वारंवार कचरा जमा होणाऱ्या ठिकाणी कचरा उचलण्याच्या वाहनांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्या, असेही निर्देश त्यांनी दिले. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचार करण्यासाठी औषधी उपलब्ध करावी, असेही निर्देश डॉ. चौधरी यांनी यावेळी दिले.




