मनपा आयुक्त यांच्या हस्ते चिल्ड्रन ट्राफिक पार्क नूतनीकरणाचे भूमिपूजन
नागपूर समाचार : नागरिकांना वाहतूक सुरक्षेबाबत प्रबोधन करण्याकरिता मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून नूतनीकरण केल्या जाणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ट्राफिक पार्कचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते बुधवारी (ता.१३) भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मनपाचे उपायुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता श्री. कमलेश चव्हाण, उपअभियंता श्री. सचिन चमाटे व जनआक्रोशचे अध्यक्ष श्री. प्रकाश खांडेकर, उपाध्यक्ष अनिल जोशी, सचिव श्री. रवी कासखेडीकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री तथा खासदार नितिन गडकरी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सन 204-25 अंतर्गत ट्राफिक पार्क येथे आवेदन स्वीकार केंद्राकरिता शेडचे बांधकाम, विद्यमान रस्त्यांचे डांबरीकरण, वाहतुक दिशा दर्शक/ निर्देशक फलक उभारणे, विद्यमान रस्त्यांना वाहतुक नियामवलीनुसार थर्मो प्लास्टिकच पेंटद्वारे दर्शक/ रंग रंगोटी करणे (झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग ईत्यादी), विद्यमान रस्त्याच्या दोन्ही बाजुस पादचारी मार्गाची दुरुस्ती व सुस्तीती करणे, शाळा , दवाखाना, बँक(एटीएम) शासकीय कार्यालय इत्यादीबाबत माहिती देण्याबाबत इमारतीचे प्रतिमा तयार करण्यात येणार आहे. या ट्रॉफिक पार्कमध्ये चालू शैक्षणिक सत्रात नागपुरातील विविध शाळांमधील विद्यार्थांना वाहतूक सुरक्षेचे प्रबोधन जनआक्रोशतर्फे करण्यात येणार आहे.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी चिड्रन ट्राफिक पार्कच्या नुतनीकरणासाठी मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत विकास कामे करण्यात येत असल्याने श्री. गडकरी यांचे आभार मानले. पुढे डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, जबाबदार नागरिक घडविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुक नियमाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण जनआक्रोशतर्फे चिल्ड्रन ट्राफिक पार्कमध्ये दिले जाणार असल्याने त्यांनी घेतलेल्या पुढाकाराची व वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृतीबाबत प्रशंसा केली. ट्राफिक पार्कमधील गुणवत्ता पूर्ण कामासाठी व इतर मदतीसाठी मनपा सदैव तत्पर असल्याची ग्वाही डॉ. चौधरी यांनी यावेळी दिली.
यावेळी जन आक्रोश चे अध्यक्ष श्री. प्रकाश खांडेकर यांनीही या ट्राफिक पार्कच्या माध्यमातून बालमनावर वाहतुक नियमांचे चांगले संस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. जन आक्रोशचे सचिव श्री. रवी कासखेडीकर यांनी जनआक्रोशतर्फे करण्यात येत असलेल्या वाहतुक नियमांच्या जनजागृती बाबत विस्तृत माहिती दिली.