- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आमदार संदीप जोशींची मनमोकळी कबुली – ‘संवाद’मध्ये उलगडला जीवन प्रवास

नागपूर समाचार : थांबायचं कुठे, हे आपण ठरवायला हवं. ईर्षा नको, निवृत्ती स्वीकारायला हवी, असं स्पष्ट मत व्यक्त करत आमदार संदीप जोशी यांनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीतील संघर्ष, यश-अपयश, आठवणी आणि प्रेरणादायी अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले. विदर्भ हिंदी साहित्य संमेलनतर्फे आयोजित ‘संवाद’ या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक सागर खादीवाला यांनी त्यांची अत्यंत मनमोकळी मुलाखत घेतली.

मोर हिंदी भवन, नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीस उमेश शर्मा यांनी स्वागत केले. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश व्यास यांनी आमदार जोशी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर रंगत गेली मुलाखत संदीप जोशी यांच्या अनुभवांनी आणि आठवणींनी भरलेल्या संवादाने.

राजकारणात येण्याआधी अधिक आनंदी होतो!

आ. संदीप जोशी यांनी आपल्या सुरुवातीच्या आयुष्याची आठवण करत सांगितलं की, १९८५ मध्ये दहावी पास झालो. प्रोफेसर व्हायचं स्वप्न होतं. पण घरात आई-बाबा शिक्षकी पेशात असल्यामुळे काहीतरी वेगळं करावं असं त्यांना वाटायचं. मग मी अन्य नोकरीचा पर्याय निवडला. जे. सी. अँड सन्स प्लायवुडमध्ये सर्व्हिस मॅनेजर आणि नंतर निप्पो बॅटरीजमध्ये नोकरी केली. पण १९९८ साली नोकरी सोडून राजकारणात उतरायचं ठरवलं. पत्नीने माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिली. ती झेरॉक्स मशीन चालविली, सायबर कॅफे चालवला. ती कष्ट करत होती आणि मी भाजप युवा मोर्चात सक्रिय राहत होतो, असे सांगत पत्नीने दिलेल्या सोबतीचा अभिमानाने उल्लेख केला.

सासऱ्यांना मिळणारे तिकीट मला मिळालं!

मनपा निवडणुकीच्या एका किस्स्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं, सासऱ्यांना तिकीट मिळणार होतं, पण ते मला मिळालं. प्रारंभी ते नाराज झाले. पण पत्नी माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिली.

गडकरींमुळे समाजसेवेची प्रेरणा मिळाली!

आपल्या राजकीय प्रेरणांचा उल्लेख करताना ते म्हणाले, ८० टक्के समाजसेवेची प्रेरणा नितीन गडकरी यांच्याकडून मिळाली. नियम माहित असले तरी, माणूस जर ठाम असेल तर काम लवकर होतं.

कलाविश्वातली सुरुवात आणि सावरकर प्रेम

राजकीय क्षेत्रात येण्याआधी संदीप जोशी यांनी अभिनय क्षेत्रातही आपली चुणूक दाखविली. वयाच्या १९ व्या वर्षी प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त यांच्या चित्रपटात काम केलं. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात डॉ. हेडगेवार यांची मध्यवर्ती भूमिका साकारली. मराठीत गाजलेल्या ‘वजीर’ या चित्रपटाचे प्रख्यात दिग्दर्शक उज्ज्वल ठेंगडी यांनी ‘राजे शिवछत्रपती’ या नाटकात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका दिली. मी त्यावेळी महापौर असल्याने प्रारंभी या भूमिकेला नकार दिला होता. मात्र, यावरच चित्रपट निघणार होता. त्यात माधुरी दीक्षित ह्या जिजाऊ यांची भूमिका करणार होत्या. मलाही त्या चित्रपटात ते घेणार होते. केवळ माधुरी दीक्षित राहणार या एकमेव कारणाने मी नाटकातली भूमिका प्रारंभी स्वीकारली असल्याचा एक मिश्कील किस्साही त्यांनी यावेळी सांगितला. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चाहता आहे, असा गौरवोल्लेख त्यांनी केला. त्यांच्या जीवनावर आधारित रणदीप हुडा यांचा चित्रपट मी स्वत: सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे चाहत्यांना दाखविला होता, असेही त्यांनी सांगितले.

‘दीनदयाळ थाळी’मागचं हृदयस्पर्शी कारण

ते पुढे म्हणाले, धंतोलीत एका रुग्णालयात ICU मध्ये एका महिलेचा पती ॲडमिट होता. उपचारासाठी गळ्यातले मंगळसूत्र दिले. तिच्याजवळ असलेल्या लहान मुलीला अन्न खाऊ घालायला पैसे तिच्याजवळ नव्हते. एका रिक्षावाल्याने तिच्या या अवस्थेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. दोन तास माझ्यासोबत घालव. तुला पैसे देतो, असे म्हटले. आमच्या एका कार्यकर्त्याच्या लक्षात आले. त्याने रिक्षावाल्याला चोप दिला. मला फोन करून घटना सांगितली. आम्ही तिची व्यवस्था केली. मात्र, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांचे काय, हा प्रश्न मला अस्वस्थ करून गेला. त्यातूनच ‘दीनदयाळ थाळी’ योजनेची कल्पना पुढे आली. आज मेडिकल कॉलेज परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांना १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले जाते. दररोज एक हजार लोक जेवतात. १९ लाखांहून अधिक लोकांनी आतापर्यंत दीनदयाळ थाळीचा लाभ घेतला आहे. कोरोनाकाळात दररोज 10 हजार टिफीन आम्ही तयार करत होतो, असेही त्यांनी सांगितले.

गुटखाबंदी, नियम, रस्ते आणि वास्तव

नागपूरचे रस्ते देशातील सर्वोत्कृष्ट असल्याचं नमूद करत ते म्हणाले, नियम पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. गुटखा बंदी असूनही विकला जातो. हे आयुष्य नष्ट करतं. शोकांतिका अशी की, कठोर नियम करणारेही गुटखा खातात. या वाईट सवयी त्यागून चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वत:पासून करायला हवी. मी नियम पाळणार, मी गुटखा खाणार नाही, हे स्वत: स्वत:साठी ठरवायलाच हवे. बदल हा स्वत:पासून सुरू करायला हवा, असे आ. जोशी म्हणाले.

पदवीधरमधील पराभवाचे शल्य

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीतील पराभवाची आठवण सांगताना ते म्हणाले, 52 वर्षांपासून भाजपकड असलेली जागा आपण वाचवू शकलो नाही. तो पराभव जिव्हारी लागला होता. तेव्हा वाटलं होतं राजकारण सोडून द्यावं. पण सावरलो. चांगले कामं करत राहिले. पण हेच क्षण आपल्याला अधिक मजबूत करतात, असा विश्वास आमदार संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

पालकत्व, समाजसेवा आणि आदर्श

कोरोना काळात पालकत्व हिरावलेल्यांसाठी ‘सोबत पालकत्व’ प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाच्या माध्यमातून २५३ मुलांचं पालकत्व घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अटल बिहारी वाजपेयी आपले आदर्श असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. नाराजी ठेवू नका. सेवेच्या माध्यमातून समाजाला जोडा, हा मंत्र देत सतत काम करत राहा, हीच खरी प्रेरणा, अशा शब्दांत त्यांनी आपल्या जीवनदृष्टीचा सारांश दिला.

प्रत्येक घटकांचा विचार करणारे मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही त्यांनी यावेळी विशेष कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संयमी आणि शिस्तप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कामाचा आवाका आणि निर्णयांचा धडाका प्रचंड आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार ते करतात. त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणं, हे आमचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यकर्त्यांचं प्रेम हीच ऊर्जा

कार्यक्रमाचा शेवट त्यांनी अत्यंत भावनिकपणे केला. कार्यकर्त्यांचं प्रेम हीच माझी ऊर्जा आहे. नितीनजी, देवेंद्रजी यांचं नेतृत्व प्रेरणादायी आहे. संधी मिळाली की समाजासाठी अधिक काहीतरी करायचं, हीच माझी धारणा आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *