- Breaking News, नागपुर समाचार

रामटेक समाचार : पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी घेतली ‘पोलीस – जनता संवाद सभा’; नागरिकांच्या अडचणी जाणून तत्काळ उपाययोजना

रामटेक समाचार : पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मा. हर्ष ए. पोद्दार यांनी दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत खातरोड (ता. रामटेक) येथील देखमुख लॉनमध्ये ‘पोलीस – जनता संवाद सभा’ घेतली.

या सभेमध्ये कोदामेंढी, खातरोड परिसरातील शंभर ते दीडशे नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या भागातील विविध समस्या, अडचणी व तक्रारी थेट मा. पोलीस अधिक्षकांसमोर मांडल्या. जनतेच्या भावना समजून घेत त्यांनी काही समस्यांवर तात्काळ उपाययोजना केल्या, तर उर्वरित अडचणींचे लवकरात लवकर निवारण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सभेला रामटेक उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, अरोली पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्यासह अरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या संवाद सभेने पोलीस प्रशासन व सामान्य नागरिकांमधील बंध अधिक मजबूत होण्यास मदत झाली असून, हा उपक्रम पोलीस प्रशासनाच्या लोकाभिमुख धोरणांची जाणीव करून देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *