- Breaking News

मुंबई समाचार : ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन; मनोरंजन विश्वात शोककळा

मुंबई समाचार : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या केवळ ४२व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतल्याने चाहत्यांना आणि कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. प्रकृती अचानक खालावल्याने तिचे पती, अभिनेता पराग त्यागी यांनी तिला तत्काळ मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

शेफाली जरीवाला ही 2002 साली प्रदर्शित झालेल्या ‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यामुळे रातोरात चर्चेत आली होती. तिच्या बोल्ड अंदाजाने या गाण्याला जबरदस्त लोकप्रियता मिळाली होती. हे गाणं मूळचं 1964 मधील ‘समझौता’ चित्रपटातील असून लता मंगेशकर यांचा आवाज आणि कल्याणजी-आनंदजी यांचं संगीत लाभलेलं होतं. शेफालीच्या सादरीकरणामुळे हे रिक्रिएटेड व्हर्जनही सुपरहिट ठरलं.

शेफाली जरीवालाचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य

15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे जन्मलेल्या शेफालीनं संगणक अनुप्रयोग विषयात पदवी घेतली होती. केवळ एका म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धी मिळवणाऱ्या शेफालीनं नंतर ‘नच बलिए 5’ आणि ‘नच बलिए 7’ सारख्या डान्स रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला होता. 2019 मध्ये ती ‘बिग बॉस 13’ या शोची स्पर्धक देखील होती.

शेफालीचं वैयक्तिक आयुष्य काहीसं वादळवारे असं होतं. 2004 मध्ये तिनं संगीतकार हरमीत सिंग (मीत ब्रदर्स) यांच्याशी विवाह केला होता. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही आणि 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये तिनं अभिनेता पराग त्यागीशी दुसरं लग्न केलं.

शेफालीच्या अचानक निधनामुळे संपूर्ण टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्री शोकमग्न झाली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *