नॅशनल पीडियाट्रिक एपिलेप्सी कॉनक्लेव उद्घाटन
नागपूर समाचार : कुठल्याही क्षेत्रात एकात्मिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी त्या क्षेत्रात नवनवे संशोधन खूप आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात देखील नव्या संशोधनांनी रुग्णसेवेत मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार, दि. २७ जून २०२५) केले.
महाराष्ट्र अकेडेमी ऑफ पीडियाट्रिक न्यूरॉलॉजी व इंडियन एपिलेप्सी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॅशनल पीडियाट्रिक एपिलेप्सी कॉनक्लेवचे उद्घाटन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. प्रमोद गिरी, डॉ. लोकेंद्र सिंग, डॉ. अमरजित वाघ, डॉ. वानखेडे, डॉ. विनयन, डॉ. विलास जाधव आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे आणि नागपुरात पीडियाट्रिक न्यूरॉलॉजी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कॉन्कक्लेव होत आहे, याचा मनापासून आनंद आहे. अद्ययावत तंत्रज्ञान-विज्ञानाचा वापर वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचा ठरत आहे. वैद्यकीय विज्ञानात होत असलेले नवनवे संशोधन आणि डॉक्टरांचा अनुभव यांचे अनेक असाध्य आजारांवरील उपचारात मोठे योगदान ठरत आहे.’
नागपूरसारख्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कॉन्फरन्स आयोजित करणे कौतुकास्पद आहे. कारण नागपूर आता हेल्थ हबच्या दिशेने वाटचाल करीत आहे. देशाच्या हृदयस्थानी असल्यामुळे शेजारच्या राज्यांमधील रुग्ण देखील याठिकाणी उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. भविष्याचा वेध घेऊन केलेले संशोधन कुठल्याही क्षेत्रात महत्त्वाचे ठरते. वैद्यकीय क्षेत्रातही याचीच गरज आहे आणि त्यादृष्टीनेच देशात काम सुरू आहे, असे सांगतानाच अमेरिका आणि युरोपमध्ये भारतीय डॉक्टरांनी खूप नाव कमावल्याचा अभिमान असल्याचेही ना. श्री. गडकरी म्हणाले.