आणीबाणी काळातील दडपशाहीच्या आठवणींना नागपुरातील कारावास भोगलेल्या ज्येष्ठांनी दिला उजाळा
नागपूर समाचार : 1970 चे दशक हे मुळात विविध आव्हानांनी गाजलेले होते. आम्ही 19-20 वर्षाचे होतो. शाळेतील गुरुजींनी स्वातंत्र्याचे जे मोल आमच्या मनावर बिंबविले होते त्यामुळे देशासाठी एक जागरुकता आमच्या मनात होती. 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाली. कोणी काहीही बोलण्यास सुरुवातीला एक दिवस घाबरत होते. दुसऱ्या दिवशी मात्र आपले व्यक्तीस्वातंत्र्य आणीबाणीने संकटात आणल्याचे लक्षात येताच आम्ही रस्त्यावर उतरलो. ताणाशाही नही चलेंगी पासून अंधेरे में एक प्रकाश या नाऱ्यांनी आम्हाला अटक झाल्याचे श्रीपाद रिसालदार यांनी सांगितले.
श्रीपाद रिसालदार यांना आणीबाणीच्या काळात अटक होऊन कारावास भोगावा लागला. आम्हाला भविष्यात नोकऱ्या मिळणार नाहीत इथपासून विविध प्रकारची भिती दाखविण्यात आली होती. कुठल्याही भितीला आता जर आपण घाबरलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे आमच्या मनाने हेरले. व्यक्तीस्वातंत्र्याच्या हक्कासाठी आम्ही जेलमध्ये जाणे पसंत केले, असे माजी उप प्राचार्य डॉ. कुमार शास्त्री यांनी आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देतांना सांगितले.
कोणत्याही अन्यायाविरुध्द संघटीतपणे उभे राहणे यात समाजाचे व्यापक हित असते. हे हित ओळखून आम्ही आणीबाणीविरुध्दच्या लढ्यात उतरलो. माझ्या वडिलांना मीसा कायद्याखाली अटक करण्यात आली. आईने महिला सत्याग्रहात भाग घेतल्याने तिला अटक झाली. माझ्याविरुध्दही वारंट निघाले होते. मी अंडरग्राऊंड पत्रके वाटणे, संघटन करणे ही जबाबदारी पाहत होतो. पोलीसांनी मलाही अटक करुन आमचे पूर्ण घर जेलमध्ये गेले. आज व तेव्हाही याबद्दल भिती नव्हती अशी आठवण रवींद्र कासखेडीकर यांनी सांगितली.
आमच्या बरोबर जेलमध्ये सर्वच पक्षाचे लोक होते. अनेक मुस्लीमही होते. आम्ही युवक म्हणून नेशन फस्ट ही भूमिका व तत्व पाळले. जेलमध्ये असल्याने बाहेरच्या जगात काय सुरु आहे याची कोणतीही कल्पना आम्हाला मिळत नव्हती. संपूर्ण जेल आमचा एक परिवार झाला. यातच आम्ही एक ना एक दिवस हा काळानिर्णय बदलला जाईल याची खात्री बाळगून होतो, असे अविनाश संगवई यांनी आणीबाणीतील आठवणींना उजाळा देतांना सांगितले.