■ ‘दि सायलेंट ट्रायबल्स ऑफ बस्तर’ या पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर समाचार : छत्तीसगड आणि गडचिरोलीमध्ये आज रस्ते उत्तम झाले. गडचिरोलीत तर उत्तम दर्जाचे लोहखनीज आहे. याठिकाणी आता सात हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. गोंडवाना विद्यापीठ झाले आहे. रोजगाराभिमूख शिक्षणाची सोय होत आहे. अशात आदिवासींची संस्कृती आणि या भागांमधील पर्यावरणाचे संवर्धन करून त्यांचे जीवनमान सुधारण्याची आणि आदिवासी समाजाचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.
प्रकाश खेळकर यांच्या आदिवासी समाजाचे जीवन व लोकसंस्कृतीवर आधारित ‘दि सायलेंट ट्रायबल्स ऑफ बस्तर’ या पुस्तकाचे प्रकाशन ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रेस क्लब येथे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, लेफ्ट. जनरल विनोद खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आदिवासी भागात सामाजिक-आर्थिक परिवर्तन खूप आवश्यक आहे. या ठिकाणी विषमतेतून संघर्षाचे बिजारोपण झाले. पण ही विषमता संपवायची असेल तर आदिवासी तरुणांच्या हाताला रोजगार मिळणे आवश्यक आहे. यातूनच आदिवासी कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. संस्कृती आणि पर्यावरणाचे संवर्धन करून आदिवासींचे जीवनमान सुधारले पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.’
छत्तीसगडमध्ये बस्तर आणि गडचिरोलीतील आदिवासी क्षेत्रात फिरण्याची मला बरीच संधी मिळाली. या भागात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण आहे. पण रस्ते उत्तम झाले आहेत. उद्योग येऊ लागले आहेत. १९९५ ते २००० या कालावधीत राज्यात मंत्री असताना मला आदिवासी गावांना मजबूत रस्त्यांनी जोडता आले, असेही ते म्हणाले. गडचिरोली येथे कै. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून १८०० एकल विद्यालये चालविली जातात. याठिकाणी २००० शिक्षक आहेत. येथील विद्यार्थ्यांची आकलन क्षमता कमालीची आहे. त्यांच्या क्षमतांचा विचार करून उत्तम शिक्षण देण्याचे काम सुरू आहे, याचाही उल्लेख ना. श्री. गडकरी यांनी केला.