- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांची टीका

म्हाळगीनगर, धंतोली, गड्डीगोदाम येथे जाहीर सभांचे आयोजन

नागपूर समाचार :- ऐंशी वेळा घटना तोडणारे काँग्रेसवाले आज भाजपबद्दल अपप्रचार करीत आहेत. पण संविधान बदलताच येत नाही हे वास्तव आहे. सर्वोच्च न्यायालयात केशवानंद भारती केसमध्ये निर्णय दिलेला आहे. संविधानातील मूलभूत रचनेला धक्का लावता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र जे कामाच्या भरवशावर निवडून येऊ शकत नाहीत, ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अपप्रचार करीत आहेत, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केली. 

दक्षिण नागपुरातील म्हाळगी नगर चौक येथे ना. श्री. गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, आमदार मोहन मते, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, शिवसेनेचे (शिंदे गट) नेते सूरज गोजे आदींची उपस्थिती होती. ‘नागपूर शहरात अजून बरीच कामे करायची आहेत. रिंगरोडवर लवकरच उड्डाणपुलाची निर्मिती होणार आहे. याच मार्गाने इलेक्ट्रिक ट्रॉली बस सुरू करण्याचाही माझा प्रयत्न आहे,’ असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

‘१९८० ला राजकीय जीवन सुरू केले तेव्हापासून ४५ हजारांपेक्षा जास्त लोकांचे हार्टचे अॉपरेशन केले. हजारो दिव्यांगांना कृत्रिम अवयव दिले आणि वैद्यकीय मदत केली. ज्येष्ठ नागरिकांचे डोळ्यांचे अॉपरेशन केले, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना कर्णयंत्र दिले. हे काम करताना जात-पात-धर्म बघितला नाही. मी जातीचे राजकारण कधीच केले नाही. ताजबागच्या सौंदर्यीकरणाचे काम केले आणि दीक्षाभूमीचे काम सुरू झाले आहे,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *