- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भाजपची मुत्तेमवार यांच्या विरुद्ध आचार संहिता भंगाची तक्रार

मुत्तेमवारांचेही भाजपला उत्तर

नागपूर समाचार : माजी केंद्रीय मंत्री व विलास मुत्तेमवार यांनी काल काँग्रेसच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांच्याविषयी अश्लाघ्य भाषेचा वापर केला. त्याविरोधात भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे मुत्तेमवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

मुत्तेमवार यांनी काल आपल्या भाषणात,मोदी हे चारशे पारचा दावा करतात,त्यांच्या बापाचा राज आहे का?अश्‍या शब्दांचा उपयोग केला.यावर आक्षेप नोंदवित, भाजपने मुत्तेमवार यांच्या विरोधात आचार संहितेच्या भंगची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या स्वरुपात नोंदवली.

या शिवाय कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ‘मी दीक्षाभूमी बोलतोय’ असा व्हिडीओ टाकला. त्यात भाजपचा उल्लेख करुन जात, धर्म, पंथ यांच्या नावाने मते मागण्यात आली आहे .यावर निवडणूक आयोगाने कलम १२३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

मुत्तेवारांनी यावर उत्तर देत, भाजपला त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते चवताळले असल्याचे सांगितले.

भाजपच्या स्वार्थाच्या राजकारणाला सामान्य माणूस कंटाळला आहे. इंडिया आघाडीतील उमेदवार विकास ठाकरे यांना शहरात मिळणारा प्रतिसाद बघून भाजपचे नेते चवताळले आहे. मी कालच्या सभेत उपस्थित केलेले महागाई, बेरोजदारी, भ्रष्टाचाराचे प्रश्न भाजपला झोंबले आहे. जनतेचा कौल बघून भाजपचे लोकसभा उमेदवार नितीन गडकरी स्वतः घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी भायुमोच्या कार्यकर्त्यांना माझ्या घराजवळ भ्याड कृत्य करण्यासाठी पाठवले,असा आरोप मुत्तेमवारांनी केला.

शंकरनगर येथील निवासस्थानाजवळ भायुमोच्या कार्यकर्त्यांच्या अवैध गोंधळाचा माध्यमांसमोर त्यांनी समाचार घेतला.

मुत्तमेवार म्हणाले,की नागपुरात प्रत्येक विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा मिळत आहे. सर्व मतदार हे सुज्ञ असून त्यांनी भाजपचे ‘आभासी’ विकास अनुभवले आहे. शहरातील जनतेने परिवर्तानाची हाक दिली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणून आचारसंहिता लागू असताना विना परवानगी मोठ्या संख्येत भाजपा युवा मोर्चाचा टोळका माझ्या घरा जवळ पूर्वनियोजितपणे गोळा झाला. त्यांनी माझ्या विरोधात अश्लिल घोषणा दिल्या. एक पुतळाही त्यांनी जाळला. यावरुन नितीन गडकरी किती घाबरले आहेत. हे दिसून येते,अशी टिका त्यांनी केली.

‘आमच्याकडेही हजारो कार्यकर्ते प्रत्येक मतदार संघात सक्रीय आहेत. त्यांना जर घटनेबद्दल कळालं असतं तर त्यांना इथे पोहोचण्यापासून कोणी अडवू शकत नव्हता. मात्र आम्हाला शहराचे वातावरण शांत हवे आहे. आम्हाला निवडणूका शांततेत पार पाडायच्या आहेत, म्हणून आम्ही कायद्याच्या मार्गाने चालत आहोत. आजची घटना ही खूप खालच्या पातळीची असून या अवैध कृत्याबाबत आम्ही तक्रार दाखल केली आहे. संबंधीतांवर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,असा इशारा ही त्यांनी दिला.

थोडक्यात, नागपूर लोकसभा मतदारसंघात दोन राष्ट्रीय पक्षांमधील लढत ही आता १९ एप्रिल रोजी मतदान होईपर्यंत कोणकोणती दिशा घेते,याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *