- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नवमतदारांसाठी 7 एप्रिल रोजी ‘केक पार्टी’; शेफ विष्‍णू मनोहर तयार करणार 15×5 फूट आकाराचा ‘महा केक’

चला साजरा करुया लोकशाहीचा उत्‍सव

नागपूर समाचार : पहिले प्रेम, पहिले ब्रेकअप, पहिला कॉलेज प्रवेश अशा अनेक प्रसंगी ‘केक पार्टी’ करणारे सर्व युवा मित्र-मैत्रिणी यंदा पहिल्‍यांदाच मतदानाचा हक्‍क बजावणार असल्‍यामुळे प्रसिद्ध शेफ विक्रमवीर विष्‍णू मनोहर यांनी आगळ्यावेगळ्या ‘केक पार्टी’ चे रविवार, 7 एप्रिल रोजी आयोजन केले आहे. दुपारी 4 ते 7 वाजेदरम्‍यान इन्स्टिट्यूट ऑफ इंज‍िनियर्स, धरमपेठ येथे शेफ विष्‍णू मनोहर या ‘केक पार्टी’ साठी 15×5 फूट आकाराचा सर्वात मोठा केक तयार करतील. मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे.

लोकसभा निवडणुकीचे सध्‍या धुमशान सुरू असून प्रत्‍येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्‍क बजावण्‍याची उत्‍तम संधी आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले हजारो युवक-युवती पहिल्‍यांदाच या मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. नवमतदारांमध्‍ये जनजागृती करण्‍याच्‍या उद्देशाने जिल्‍हाधिकारी व नागपूर जिल्‍हा निवडणूक कार्यालयाकडून शेफ विष्‍णू मनोहर यांची ‘एसव्‍हीप आयकॉन (SVEEP ICON)’ म्‍हणून नामनिर्देशित करण्‍यात आले आहे. त्‍याअंतर्गत ‘मेरा वोट, देश के लिए’ या मध्‍यवर्ती संकल्‍पनेवर आधारित ही ‘केक पार्टी’ आयोजित करण्‍यात आली आहे.

अनेक विश्‍वविक्रमांवर आपले नाव कोरणा-या शेफ विष्‍णू मनोहर यांनी याआधी रामभक्‍तांसाठी 7 हजार किलोचा श्रीराम हलवा, सीमेवरील जवानांसाठी 6 हजार किलोचा चिवडा, मिलेट्स वर्षानिमित्‍त 5 हजार किलोची तृणधान्‍य खिचडी तयार केली आहे.

या उपक्रमाला जिल्‍हाधिकारी कार्यालय व नागपूर जिल्‍हा निवडणूक कार्यालयाचे सहकार्य लाभले असून त्‍यांच्‍याद्वारे युवक-युवतींसाठी मतदार यादी नाव नोंदवण्‍याची येथे व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. या संधीचा लाभ घ्‍यावा व लोकशाहीच्‍या या उत्‍सवात सहभागी होण्‍यासाठी नवमतदार व पालकांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व शेफ विष्‍णू मनोहर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *