- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : गोरगरिबांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे – केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी

ख्रिश्चन समुदायातील बांधवांसोबत संवाद

नागपूर समाचार : संपूर्ण नागपूर शहर माझा परिवार आहे. मी जात-पात-धर्माचा फरक करत नाही. कुणीही व्यक्ती जात-पात-धर्माने नव्हे गुणांनी मोठी असते. त्यामुळे माझ्या डोळ्यापुढे कायम समाजातील उपेक्षितांसाठी काम करण्याचे उद्दिष्ट असते. मला नागपूर शहराला झोपडपट्टीमुक्त करायचे आहे, शहराला एज्युकेशन हब म्हणून नावलौकिक मिळवून द्यायचे आहे. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील प्रगतीच्या प्रवाहात गोरगरिबांना आणायचे आहे, असा मानस केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) केले.

सिव्हिल लाइन्स येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये ‘प्रोत्साहन की दिशा’ या कार्यक्रमांतर्गत ख्रिश्चन समुदायातील मंडळींसोबत ना. श्री. गडकरी यांनी संवाद साधला. यावेळी ना. श्री. नितीन गडकरी यांचे बायबल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बिशप पॉल दुपारे, सॅमसन सॅम्युअल, भाजपचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी आमदार परिणय फुके, माजी नगरसेविका प्रगती पाटील, माजी नगरसेविका निशांत गांधी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

श्रीमती रचना सिंग यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून ना. श्री. गडकरी यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली तसेच बिशप पॉल दुपारे यांच्यासह सर्वांनी ना. श्री. गडकरी यांच्या भविष्यातील यशस्वी कारकीर्दीसाठी प्रार्थना केली. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘माझे सर्वाधिक काम कृषी, आदिवासी क्षेत्रात आहे. ‘जल, जमीन, जंगल, जानवर’ यांच्यासाठी काम करणे हेच माझे ध्येय आहे. आम्ही १८०० शाळा चालवतो. याठिकाणी १८ हजार विद्यार्थी शिकतात आणि १६०० शिक्षक कार्यरत आहेत. राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाही. माझ्यादृष्टीने सेवाकारण हे सत्ताकारण आहे. सामाजिक कार्यात मला सर्वाधिक आनंद मिळतो. जात-पात-धर्म-पक्षाच्या पलीकडे मानवतेच्या आधारावर लोकांची सेवा करतो. खोटी आश्वासने देत नाही. शेवटच्या माणसापर्यंत संपर्कात असतो. विदर्भातील हजारो लोकांवर हृदयविकार शस्त्रक्रिया केल्या. ३०० दिव्यांगांना कृत्रिम अवयव दिलेत. आज ती मंडळी फुटबॉल खेळत आहेत आणि बुलेट चालवत आहेत.’

उत्तर नागपुरात थॅलेसिमिया, सिकलसेल ही सर्वांत मोठी समस्या आहेत. गेल्या काळात ५० गरीब मुलांचे बोनमॅरोचे अॉपरेशन मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये निःशुल्क केले. ही समस्या सोडविण्यासाठी डॉक्टर मंडळी पुढे येत आहेत. त्यात आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी कोरोना काळातील वाईट परिस्थितीचा आणि त्या काळात केलेल्या सेवाकार्याचाही ना. श्री. गडकरी यांनी उल्लेख केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *