- Breaking News, Meeting, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : सामाजिक कार्यात सर्वाधिक आनंद – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी

स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी

नागपूर समाचार : माझ्या दृष्टीने राजकारण म्हणजे सेवाकारण होय. त्यामुळे मी राजकारणात सामाजिक काम करण्याचाच निर्णय घेतला. लोकांची सेवा करण्यात मला खूप आनंद मिळतो, अशा भावना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) व्यक्त केल्या.

रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. शशांक मनोहर, श्री. प्यारे खान आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘राजकारणात एकमेकांवर खूप मोठ्या प्रमाणात टीका होते. पण मी नशीबवान आहे. एकदा संसदेत माझ्या विभागावर चर्चा सुरू होती. या चर्चेत सर्व पक्षांचे नेते माझे आभार मानून भाषणाला सुरुवात करीत होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा मला फोन आला आणि तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. संसदेच्या इतिहासात हा मोठा विक्रम असल्याचे लोकसभा अध्यक्ष म्हणाले.

पक्षाच्याही पलीकडे मला प्रेम मिळाले. यासाठी स्वतःला मी भाग्यवान समजतो.’ पारदर्शकता, जलदगतीने निर्णय आणि भ्रष्टाचारविरहित काम करण्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळेच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करू शकलो, असेही ते म्हणाले. ‘आपले कोण, परके कोण याचा विचार कधीच केला नाही. जो मतदान करेल, त्याचेही काम करेल आणि जो मतदान करणार नाही, त्याचेही काम करेन, हेच माझे धोरण आहे,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *